नवी दिल्ली: ग्राहक न्यायालयाने एसबीआय लाईफला एका विमा पॉलिसी प्रकरणात चांगलेच फटकारले आहे. एका महिलेचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या परिवाराने एसबीआय लाईफकडे विमा पॉलिसीचा क्लेम केला. मात्र, एसबीआयने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे परिवाराने केलेल्या तक्रारीची दखल घेत ग्राहक न्यायालयाच्या ३ सदस्यीय पिठाने मोठा निर्णय दिला. संबंधीत महिलेच्या कुटुंबियांना (वारस) २० लाख रूपये देण्याचे आदेश न्यायालयाने एसबीआय लाईफला दिले.
ग्राहक न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, नाजिरपूर येथील नागरिक सीताराम पांडेय यांची पत्नी पुष्पा देवी यांचा १४ डिसेंबर २०१५ला अपघाती मृत्यू झाला. टॅम्पो उलटल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा प्राण गेला. पुष्पा देवी यांचा एसबीआय लाईफमध्ये विमा होता. या विम्याचे पैसे मिळविण्यासाठी पुष्पा देवीचे पती एसबीआयचे उंबरे झिजवत राहिले, पण त्यांना पैसे मिळाले नाहीत. काही काळाने तर त्यांना समजले की, त्यांचा दावाच रद्द करण्यात आला आहे.
अखेर पुष्पा देवी यांचे पती सीताराम पांडेय यांनी ग्राहक न्यायालयात दाद मागितीली. ग्राहक न्यायालयाने सर्व कागदपत्रे आणि परिस्थितीचा अभ्यास करून निणय दिला. ग्राहक फोरमचे अध्यक्ष विमोन मिश्र, सदस्य लक्ष्मण कुमार आणि रंजना झा यांनी सांगितले, हा सर्वात मोठा निर्णय आहे. न्यायालयाने पांडेय यांना २० लाख रूपये देण्याचे आदेश एसबीआय लाईफला दिले. तसेच, ३००० रूपये मानसिक त्रास आणि २००० हजार रूपये खटल्याच्या खर्चापोटी देण्याचेही आदेश दिले आहे. दरम्यान, ही रक्कम जर ९० दिवसांच्या आत दिली नाही तर, त्यावर ६ टक्के व्याजही एसबीआयने पांडेय यांना द्यावे लागेल, असेही न्यायालयाने म्हटल्याचे त्यांनी सांगितले.