नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे निश्चित झाले आहे. भाजपकडून मंत्रिमंडळ विस्ताराला ग्रीन सिग्नल मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. मंत्रिमंडळात कोणाला स्थान द्यायचे आणि विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीत दि. ९ जून रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे कोणाल संधी मिळणार याची चर्चा सुरु झाली आहे. त्याचवेळी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिलेले राधाकृष्ण विखे-पाटील यांचा भाजप पक्ष प्रवेश होण्याचे संकेत आहेत. तसेच भाजप प्रवेशानंतर मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळणार का, याचीही चर्चा आहे.
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची आज नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. केंद्रीय गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल महाराष्ट्राच्यावतीने त्यांचे अभिनंदन केले. विविध विषयांवर यावेळी चर्चा करतानाच केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळालेली दुष्काळ निवारणासाठीची मदत आणि राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी केलेल्या उपाययोजना इत्यादींची माहिती यावेळी त्यांना दिली. त्याचवेळी राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर ९ रोजी दिल्लीत बैठक होत आहे.
तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज दिल्लीत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची भेट घेतली. एसईबीसी आणि आर्थिक कमकुवत घटकांना आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी वैद्यकीय शाखेतील जागा वाढवून देण्यात याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शाखेच्या ८१३ जागा तर पदवी शाखांमध्ये १७४० जागा वाढवून देण्यात याव्यात, अशी मागणी करणारे लेखी पत्र मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्र्यांना दिले. या मागणीवर सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन डॉ. हर्षवर्धन यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना दिले.