शिवसेनेने जनादेशाचा अपमान केला, अमित शाह यांचा टोला

शिवसेनेने जनादेशाचा अपमान केला अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे.

Updated: Nov 27, 2019, 03:43 PM IST
शिवसेनेने जनादेशाचा अपमान केला, अमित शाह यांचा टोला title=

मुंबई : शिवसेनेने जनादेशाचा अपमान केला अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. विचारधारा सोडून ३ पक्षांची युती केल्याचा आरोप त्यांनी महाविकास आघाडीवर केला आहे. महाविकास आघाडी सत्ता स्थापन करणार हे नक्की झालं असतानाच भाजपने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना हाताशी धरून सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला. अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप करत भाजप सरकार सत्तेवर आले होते. आमच्याकडे पवारांविरोधात ट्रकभर पुरवे असून अजित पवार आता तुरुंगात चक्की पिसणार असेही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत सांगितले होते. पण ही आघाडी केवळ साडे दिवसच टीकली. त्यानंतर महाविकास आघाडीने सत्ता स्थापनेचा दावा केला. हा दावा अमित शाह यांच्या पचनी पडला नसल्याची चर्चा आहे.

शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यासाठी एका वृत्तसंस्थेव्यतिरिक्त कोणालाही निमंत्रित करण्यात आले नव्हते. पहाटे राजभवनात हा शपथविधी पार पडला. यासाठी मध्यरात्रीच राष्ट्रपती राजवट देखील हटवण्यात आली. अजित पवार यांनी आपल्याकडे पाठिंबा असलेल्या आमदारांचे पत्र असल्याचे फडणवीस यांना सांगितले. त्यानंतर भाजपने केंद्रीय नेतृत्वाला कळवल्यानंतर सर्व सुत्र कामाला लागली. रात्रभर कायदेशीर बाबी पूर्ण करत दिवस सुरु होण्याच्या आत हा शपथविधी झाला. यानंतर काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच भाजपच्या अन्य केंद्रीय नेत्यांनीही अजित पवार यांचे ट्विटरवर अभिनंदन केले. अजित पवार देखील ट्विटरवर अॅक्टिव झाले आणि त्यांनी या सर्वांचे अभिनंदन स्वीकारत आभार मानले. 

पण आपल्यामागून येतो म्हणालेले आमदार शरद पवारांनी नजर फिरवल्यानंतर परतल्याचे अजित पवारांच्या लक्षात आले. आपल्यामागे कोणीच नाही त्यामुळे बहुमत सिद्ध करताना होणारी नाचक्की टाळण्यासाठी त्यांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. अजित पवारांच्या विश्वासावर सत्ता स्थापन करु पाहणाऱ्या फडणवीस यांनी देखील आपला राजीनामा सोपावला. 

महाविकास आघाडीचे सरकार हे रिक्षाच्या ३ चाकांप्रमाणे आहे. ३ चाकं ३ बाजूला जातील अशी भविष्यवाणी यावेळी माजी मुख्यमंत्र्यांनी वर्तवली. त्यामुळे भाजपच्या गोटातील अस्वस्थता अद्याप लपून राहीलेली नसल्याचे समोर आले आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x