'बघा, इतकं सांगूनही महाराष्ट्र सरकारने अजूनही मजुरांची यादी दिली नाहीये'

राज्य सरकारने यावर कोणतीच कार्यवाही न केल्यामुळे पियूष गोयल यांनी पुन्हा ट्विट करून उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. 

Updated: May 24, 2020, 10:06 PM IST
'बघा, इतकं सांगूनही महाराष्ट्र सरकारने अजूनही मजुरांची यादी दिली नाहीये'

मुंबई: स्थलांतरित मजुरांसाठी सोडण्यात येणाऱ्या श्रमिक ट्रेनच्या मुद्द्यावरून आता केंद्र आणि राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. आज दुपारीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वे मंत्रालय महाराष्ट्राची तयारी असूनही कमी रेल्वेगाड्या सोडत असल्याची तक्रार केली होती. उद्धव ठाकरे यांचा हा आरोप रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्यामुळे पियूष गोयल यांनी आज संध्याकाळी ट्विट करुन रेल्वे मंत्रालय सोमवारी महाराष्ट्रात १२५ ट्रेन पाठवायला तयार असल्याचे सांगितले होते. त्यासाठी तासाभरात महाराष्ट्र सरकारने रेल्वे प्रबंधकांकडे मजुरांची यादी व इतर तपशील पाठवावा, असे गोयल यांनी सांगितले होते. 

उद्धवजी महाराष्ट्रात १२५ ट्रेन पाठवतोय, फक्त रिकाम्या परत पाठवू नका- पियूष गोयल

मात्र, राज्य सरकारने यावर कोणतीच कार्यवाही न केल्यामुळे पियूष गोयल यांनी पुन्हा ट्विट करून उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. या ट्विटमध्ये गोयल यांनी म्हटले आहे की, दीड तास उलटून गेला तरी महाराष्ट्र सरकारने उद्या सोडण्यात येणाऱ्या १२५ श्रमिक ट्रेनसाठी आवश्यक तपशील पुरवलेला नाही. ही माहिती मिळाल्यानंतर या ट्रेन्सचे नियोजन करायला वेळ जातो. आम्हाला गेल्यावेळप्रमाणे महाराष्ट्रातून रिकाम्या रेल्वे परत आणायच्या नाहीत. त्यामुळे नियोजन न करता या निर्णयाची अंमलबजावणी करणे शक्य नाही, असेही गोयल यांनी म्हटले आहे.

कोरोनाबद्दलचा 'दिल्ली'चा अंदाज चुकवला, पण धोका कायम- मुख्यमंत्री

त्यामुळे आता राज्य सरकार काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांनी दुपारी आपल्या भाषणात आम्ही मजुरांना पाठवण्यासाठी पूर्ण तयारी केल्याचा दावा केला होता. तरीही राज्य सरकारला रेल्वे प्रबंधकांना मजुरांची यादी द्यायला इतका उशीर का लागत आहे, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.