नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत सोनिया गांधी यांना माहिती दिली. मात्र या स्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. मात्र, सरकार स्थापण करण्याबाबत चर्चा झालेली नाही, असे शरद पवार यांनी म्हटले. सोनिया गांधी यांना भेटून आल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही? सरकार स्थापन करायचे की नाही? याबाबत चर्चाच झाली नाही, असे ते म्हणालेत. त्यामुळे पवारांच्या मनात नेमके काय आहे, याचीच चर्चा सुरु झाली आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सध्या दिल्लीत चर्चा सुरू होती. सोनिया गांधींच्या भेटीसाठी बरोबर ५ वाजता शरद पवार १० जनपथवर पोहोचले. गेल्या तासाभरापासून या दोघा ज्येष्ठ नेत्यांमध्ये बोलणी झालीत. या भेटीत नेमकं ठरणार, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची कोंडी फुटण्याच्या दृष्टीने, सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यातली ही भेट महत्त्वाची मानली जात होती. मात्र, पवार यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याबाबत काहीही ठरले नसल्याचे म्हटले आहे. त्याबाबत सोनिया गांधी यांच्याशी चर्चाही झालेली नाही. केवळ राजकीय स्थितीवर चर्चा केली, असे ते म्हणालेत.
शिवसेनेसोबत सत्तास्थापन करण्याबाबत राष्ट्रवादी अनुकूल आहे. तर राज्यात शिवसेनेसोबत जाऊन सत्तास्थापन करण्याबाबत काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या अजून चर्चा सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि सोनिया गांधी भेटीत चर्चा होऊन, अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता होती. मात्र, पवारांनी दिलेली माहिती बघता अजूनही सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने काहीही ठरले नसल्याचे सांगितले.
Sharad Pawar after meeting Sonia Gandhi: We discussed in detail about Maharashtra's political situation. I briefed her on it. Mr. AK Antony was also there. Certain leaders of both(Congress-NCP) parties will meet and discuss further and get back to us pic.twitter.com/0QKsSsD8oD
— ANI (@ANI) November 18, 2019
दरम्यान, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचं पीच आता बदललेले आहे. इतके दिवस मुंबई, पुण्यात सुरू असलेला सामना आता दिल्लीत पोहोचलाय. शरद पवारांनी दिल्लीत पोहोचताच नवीच गुगली टाकली. त्याची चर्चा रंगलेली असतानाच पंतप्रधान मोदींनी संसदेत राष्ट्रवादीची पाठ थोपटली. नेमका काय असेल या दोघांच्या वक्तव्याचा अर्थ, याचीच चर्चा आहे. शिवसेना-भाजप युतीलाचा विचार असा प्रतिसवाल करत पवार यांनी गुगली टाकली.