रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात सत्तास्थापन होऊन महिना उलटलाय. मात्र सत्तासंघर्ष (Maharashtra Political Crisis) हा सुरुच आहे. या सत्तासंघर्षाचा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. या प्रकरणी आतापर्यंत पुढील सुनावणी ही 8 ऑगस्टला होणार आहे. मात्र 8 ऑगस्टला होणारी सुनावणी ही 12 ऑगस्टला होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मंत्रिमंडल विस्तार आणखी लांबवणीवर पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. (maharashtra political crisis hearing on the power struggle in supreme court is likely to be held on August 12 instead of 8)
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर राज्य सरकारचं अस्तित्व अवलंबून आहे. याआधी या सुनावणीमुळे मंत्रिमंडळ विस्ताराचे मुहूर्त हुकले आहेत. मात्र आता पुन्हा एकदा सुनावणी 4 दिवसांनंतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याला आणखी काही दिवस मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहावी लागू शकते.
राज्यात स्थानिक निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे चिन्ह कोणाकडे यासाठी निवडणूक आयोगाकडे अपील केली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ येत आहे. अशावेळी पक्षाचे दोन गट असता कामा नये, असा युक्तीवाद शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांनी केला होता. तर हे प्रकरण घटनापीठाकडे पाठवण्याची गरज नाही, असा युक्तीवाद ठाकरे गटाचे कपिल सिब्बल यांनी केला होता.
दोन्ही पक्षकारांकडून जोरदार दावे प्रतिदावे करण्यात आले. त्यामुळे न्यायालयाने 8 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार असल्याचं सांगितलं. मात्ल आता या सर्व शक्यतेमुळे नियोजित सुनावणी 8 ऑगस्टला होणार की 12, याकडे लक्ष लागून राहिलं आहे.