Scorpio अपघातात मुलाच्या मृत्यूनंतर बापाने दाखल केला खटला, महिंद्रांनी दिलं उत्तर; म्हणाले 'तुमच्या...'

स्कॉर्पिओच्या अपघातात डॉक्टर मुलाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे वडील राजेश मिश्रा यांनी आनंद महिंद्रा यांच्यासह 12 जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. कारमध्ये एअरबॅग नसल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  

शिवराज यादव | Updated: Sep 27, 2023, 04:48 PM IST
Scorpio अपघातात मुलाच्या मृत्यूनंतर बापाने दाखल केला खटला, महिंद्रांनी दिलं उत्तर; म्हणाले 'तुमच्या...' title=

स्कॉर्पिओच्या अपघातात एका डॉक्टरचा मृत्यू झाल्यानंतर महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा आणि इतर 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 14 जानेवारी 2022 रोजी झालेल्या या अपघातात अपूर्व मिश्रा यांचा मृत्यू झाला होता. ते स्वत: गाडी चालवत होते. अपूर्व यांनी सीटबेल्ट लावलेला होता. याशिवाय अपघातानंतर एअरबॅग्सही उघडल्या नाहीत.  यानंतर अपूर्व मिश्रा यांचे वडील राजेश मिश्रा यांनी आनंद महिंद्रा यांच्यासह 12 जणांविरोधात एफआयआर दाखल केला. दरम्यान कंपनीने यावर प्रतिक्रिया दिली असून, अपूर्व चालवत असलेल्या स्कॉर्पिओ एसयुव्हीच्या एअरबॅगसह कोणतीही छेडछाड कऱण्यात आली नव्हती असं सांगितलं आहे.

राजेश मिश्रा यांनीच आपल्या मुलाला ही एसयुव्ही भेट म्हणून दिली होती. या कारमध्ये एअरबॅग्सच नाहीत असा आरोप त्यांनी केला आहे. आपल्या मुलाच्या मृत्यूसाठी महिंद्रा कंपनी जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल करण्यात आला होता. एफआयआरमध्ये आनंद महिंद्रा यांच्यासह कंपनीच्या 12 जणांना आरोपी करण्यात आलं. फसवणूक, गुन्हेगारी कट रचणे आणि निष्काळजीपणाने मृत्यूला कारणीभूत ठरणे असे गुन्हे त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आले.

या घटनेनंतर 20 लाख किंमत असणाऱ्या कारमधील सेफ्टी फिचर्सवरुन लोकांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली होती. महिंद्राने आता सांगितलं आहे की, कारमध्ये एअरबॅग होत्या, पण गाडी पलटी झाल्याने त्या उघडल्या नाहीत. 

"हा एफआयआर 23 सप्टेंबर 2023 मध्ये दाखल करण्यात आला होता हे महिंद्रा अॅण्ड महिंद्राला स्पष्ट करायचं आहे. हे प्रकरण 18 महिन्यांपूर्वीचं आहे. तसंच ही घटना जानेवारी 2022 मध्ये घडली होती," असं कंपनीने सांगितलं आहे.

"कारमध्ये एअरबॅग्स नाहीत असा आरोप करण्यात आला आहे. पण आम्ही सांगू इच्छितो की, 2020 मध्ये निर्मिती करण्यात आलेल्या Scorpio S9 व्हेरियंटमध्ये एअरबॅग्स आहेत. आम्ही तपास केला असून, एअरबॅगशी कोणतीही छेडछाड करण्यात आलेली नाही. गाडी पलटी झाली असल्याने पुढील एअरबॅग उघडल्या नाहीत," असं महिंद्रा अॅण्ड महिंद्राने सांगितलं आहे.

गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात याप्रकरणी पूर्पणणे तांत्रिक तपास करण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे. "हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे आणि आवश्यक असलेल्या कोणत्याही तपासासाठी आम्ही अधिका-यांना सहकार्य करण्यास कटिबद्धल आहोत. आम्ही कुटुंबाप्रती पूर्णपणे सहानुभूती व्यक्त करतो आणि त्यांच्या दु:खात त्यांच्याप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो," असं निवेदनात म्हटलं आहे.

गेल्या काही वर्षांपासून ग्राहक कार विकत घेताना किंमतीसह सेफ्टी फिचर्सलाही जास्त महत्त्व देत असल्याचं दिसत आहे. यासह सरकारनेही वाहन सुरक्षेसंबंधी नियम कठोर केले आहेत. 

 2021 मध्ये भारतात तब्बल 4 लाख रस्ते अपघात झाले. डिसेंबर 2022 मध्ये प्रसिद्ध झालेल्या सरकारी अहवालानुसार 1.5 लाख लोक रस्ते अपघातात मृत्यूमुखी पावले. म्हणजेच एका तासात 18 जणांचा मृत्यू झाला.