नवी दिल्ली : मालेगाव स्फोटप्रकरणी प्रमुख आरोपी कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांना आज सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. मालेगावमध्ये 2008 साली झालेल्या स्फोटासाठी कर्नल पुरोहित यांनी आरडीएक्स पुरवल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी १७ तारखेला दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यावर सर्वोच्च न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता. गेल्या 9 वर्षात एटीएस किंवा एनआयएला कर्नल पुरोहित यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करता आलेलं नाही.
कारण त्यांच्याविरोधात सबळ पुरावे नसल्याचा दावा पुरोहितांचे वकील आणि ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ हरिश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयात केला.
एनआयएनं मात्र अजूनही चौकशी चालू आहे, असं म्हणत जामीनाला विरोध केला होता. आज अखेर सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. याप्रकरणी पुरोहित यांच्याआधी साध्वी प्रज्ञा सिंह यांना जामीन मंजूर करण्यात आला.