ममतादीदी का संतापल्या आणि भाषण न करता आयोजकांची कानउघडणी करून खाली बसल्या नेमकं काय घडलं?
कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. भाजप आणि तृणमूलचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी एका कार्यक्रमानिमित्तानं एकाच व्यासपीठावर पुन्हा आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदींवर चांगल्याच संतापल्या होता. निमित्त होतं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं. या कार्यक्रमात ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदींवर संतापल्या आणि नाराजीचा सूर पाहायला मिळाला.
ममता बॅनर्जी जेव्हा व्यासपीठावर भाषण देण्यासाठी पोहोचल्या तेव्हा उपस्थित असलेल्या एका गटानं जय श्रीरामच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.
भारत माता की जय, जय श्रीरामचे नारे ऐकून ममता बॅनर्जी संतापल्या. व्यासपीठावर बोलवून असा अपमान करणं योग्य नाही अशी कडाडून टीका त्यांनी यावेळी मोदी यांच्यावर केली.
कोलकात्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंतीचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा अँग्री वुमन लुक पुन्हा बघायला मिळाला. भाषणासाठी निवेदकांनी त्यांचं नाव पुकारताच उपस्थितांमधील एका गटानं जय श्री रामच्या घोषणा द्यायला सुरूवात केली.
निवेदकांनी आवाहन केल्यानंतर काही काळ शांतता झाली. मात्र ममतांनी बोलायला सुरूवात करताच पुन्हा दबक्या आवाजात घोषणा दिल्या गेल्या. त्यामुळे ममतादीदी चांगल्याच भडकल्या आणि भाषण न करता आयोजकांची कानउघडणी करून खाली बसल्या.
पश्चिम बंगालमध्ये मार्च ते एप्रिल दरम्यान विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजप विरुद्ध तृणमूल अशी चुरशीची लढत आहे. प्रचार शिगेला पोहोचला असून भाजप पुन्हा एकदा आपलं कमळ फुलवण्यासाठी कसून प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे.