मुंबई : तृणमूल काँग्रेसचे (TMC) प्रवक्ते कुणाल घोष यांनी सोमवारी एका ट्विटमध्ये म्हटलं होतं की, अभिषेक बॅनर्जी 2036 मध्ये पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होतील. त्याच वेळी मंगळवारी टीएमसी खासदार अपरूपा पोद्दार यांनी घोष यांच्या या ट्विटवर स्पष्टीकरण दिलं. अभिषेक हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पुतण्या आहे. पश्चिम बंगालच्या राजकारणात अभिषेककडे ममता यांचा उत्तराधिकारी म्हणून पाहिलं जातं. (mamta banerjee will be prime minister in 2024 says tmc mp aparupa poddar)
ममता बॅनर्जी 2024 मध्ये देशाच्या पंतप्रधान होतील आणि 2024 मध्ये अभिषेक बॅनर्जी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होतील, असे अपरूपा पोद्दार यांनी ट्विटमध्ये म्हटलं. मात्र, ट्विट केल्यानंतर जवळपास तासाभराने त्यांनी ते डिलीटही केले.
"अभिषेक बॅनर्जी 2036 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री होतील. तृणमूल काँग्रेसचा एक सैनिक म्हणून मी सांगू शकतो की ममता बॅनर्जी 2036 पर्यंत बंगालच्या मुख्यमंत्री राहतील. तसेच 2036 मध्ये अभिषेक बॅनर्जी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्या कार्यक्रमात ममता बॅनर्जी पालक म्हणून उपस्थित असतील", असं कुणाल घोष बंगालमध्ये टीएमसीच्या तिसऱ्या विजयाच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त म्हणाले होते.
"ज्योती बसू यांचा सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम ममता बॅनर्जी मोडित काढतील", असंही त्यांनी नमूद केलं. बसू 21 जून 1977 ते 5 नोव्हेंबर 2000 पर्यंत 23 वर्षे बंगालचे मुख्यमंत्री होते. संपूर्ण देशात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम पवनकुमार चामलिंग यांच्या नावावर आहे. ते डिसेंबर 1994 ते मे 2019 पर्यंत 24 वर्षे ते सिक्कीमचे मुख्यमंत्री होते.