पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरला आपल्या देशापेक्षाही जास्त श्रीमंत व्हायचं आहे. त्याने आपली ही इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली आहे. आपण पाकिस्तानात अमेरिकी डॉलर्समध्ये मोजले जाणारा पहिला अब्जाधीश असू असा विश्वासच त्याने व्यक्त केला आहे. एक दिवस आपण पाकिस्तान देशापेक्षा जास्त श्रीमंत व्हावं अशी इच्छा असल्याचंही त्याने सांगितलं आहे.
TKNS पॉडकास्टमध्ये शोएब अख्तरने हजेरी लावली. यावेळी त्याला तू वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये का गुंतत आहेस असं विचारण्यात आलं. शोएब अख्तरने आधी क्रिकेटर, ब्रॉडकास्टर, सोशल मीडिया सेलिब्रिटी आणि आता रिअल इस्टेटमध्ये आपला हात आजमवण्यास सुरुवात केली आहे. त्यावर उत्तर देताना शोएब अख्तर म्हणाला की, "मला माझ्या देशातील पहिलं अब्जाधीश व्हायचं आहे. कोणीही मला ते करण्यापासून रोखू शकत नाही".
"अमेरिकन डॉलर्समधील पाकिस्तानाताली पहिला अब्जाधीश मला व्हायचं आहे. मला एक दिवस पाकिस्तानपेक्षा जास्त श्रीमंत व्हायचं आहे. मी अजिबात मस्करी करत नाही आहे," असं शोएब अख्तरने म्हटलं आहे. दरम्यान याच कार्यक्रमात शोएब अख्तरने आपण एकमेव पाकिस्तान खेळाडू आहोत जो आपल्या अटींवर निवृत्त झाला असल्याचाही दावा केला. आपल्याला 2011 वर्ल्डकपमध्ये भारताविरोधात सेमी-फायनल खेळायची होती. पण व्यवस्थापनाने आपल्याला संधी दिली नाही. अन्यथा पाकिस्तान वर्ल्ड चॅम्पिअन असता असा दावा शोएब अख्तरने केला.
"माझ्यामध्ये दोन सामने खेळण्याची क्षमता होती. मी त्यांना सांगितलं होतं की जर त्यांना निवड करायची असेल तर मी येथे आहे आणि मी भारत आणि संघाला सोडणार नाही. जर मी खेळलो असतो तर पाकिस्तानने 2011 चा वर्ल्डकप जिंकला असता," असा विश्वास शोएब अख्तरने व्यक्त केला आहे.
शोएब अख्तरने 2011 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानकडून खेळताना तीन विकेट्स घेतले होते. ग्रुप स्टेजमधील सामन्यात तो शेवटचा खेळताना दिसला होता. शोएब अख्तरने यावेळी त्याच्यावर लावण्यात आलेल्या बंदींवरही भाष्य केलं. गर्व्हर्निंग बॉडी प्रसिद्ध होण्याच्या हेतूने माझ्यावर वेगवेगळ्या प्रकारे बंदी लावत होती असा दावा त्याने केला आहे.
"मला बोर्डाकडून काहीच समस्या नव्हती, पण त्यांना माझ्याशी होती. तुम्हीच सांगा गेल्या 200 वर्षात माझ्याइतकी जलद गोलंदाजी करणारा कोणी गोलंदाज आला आहे का? बोर्डाने दुर्मिळ खेळाडूचे नखरे सहन करायला हवेत. जर शाहीन शाह आफ्रिदी जलद गोलंदाजी करत असता तर त्याचे नखरे सहन केले नसते का? जर बाबर आझमने संघासाठी सामने जिंकले असते तर त्याला स्टारडमची मजा घेण्याची परवानगी नाही का?," अशी विचारणा शोएब अख्तरने केली आहे. 2011 वर्ल्डकपनंतर शोएब अख्तरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.