Lay`s Chips Video : बसल्या जागी काहीतरी कुरकुरीत किंवा छानसं खाण्याची इच्छा झाली की, हमखास काही पदार्थांची नावं पुढे येतात. लेस चिप्स, कुरकुरे या आणि अशा अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश असतो. पण, गेल्या काही वर्षांपासून चिप्सची पाकिटं लहान झाली, चिप्सचा आकारही लहान झाला. इतकंच काय, तर आता आता म्हणे कंपन्या चिप्सच्या किंवा या पाकिटबंद खाद्यपदार्थांच्या पाकिटांमध्ये हवा जास्त आणि खाण्याचा पदार्थ कमीच भरताना दिसत आहेत.
तुम्ही म्हणाल यात नवं काय? किंबहुना 'आम्ही हवेचेच पैसे भरतो...' असा उपरोधिक सूरही तुम्ही आळवाल. सोशल मीडियावर सध्या Lay’s या जगभरात प्रसिद्ध असाणाऱ्या आणि वेफर्सच्या ब्रँडला अनेकांनी निशाण्यावर धरलं जात आहे. निमित्त ठरतोय व्हायरल होणारा एक व्हिडीओ.
सोशल मीडियावर एका युजरनं लेसच्या सॉल्टेड वेफर्सच्या पाकिटाचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये दिव्यांशू काश्यप नावाच्या युजरच्या हाती लेसचं एक पाकिट दिसत आहे. 25 % More असं या पाकिटावर लिहिण्यात आलंय खरं, पण तसं काहीही या पाकिटात नाही हे जेव्हा त्याच्या लक्षात येतंय तेव्हा तो हे पाकिट चाचपून पाहताना दिसतोय.
इतक्यावरच न थांबता शेवटी त्यानं जेव्हा हे लेसचं पाकिट उघडलं तेव्हा त्यात फक्त दोन चिप्सच असल्यानं त्यालाही या घटनेवर विश्वास बसेना. पाच रुपयांची किंमत असणाऱ्या या पाकिटात आता खूप सारी हवा आणि अवघे दोन चिप्स, हे असंच गणित पाहायला मिळाल्यामुळं हा युजरही हैराण झाला.
Dear @Lays_India @PepsiCoIndia , today's snack session took an unexpected turn. Purchased a 5 rupee classic salted pack with hopeful anticipation, only to unveil a mere TWO chips inside. Is this the new standard? As a loyal customer, this falls short of expectations. pic.twitter.com/gGUl8Wq4MI
— Divyanshu Kashyap (@Divyans60201407) December 8, 2023
सोशल मीडियावर हा व्हिडीओ ज्यावेळी व्हायर झाला तेव्हापासून नेटकऱ्यांनी लेस आणि पेप्सिको इंडिया यांची फिरकी घेण्यास सुरुवात केली आहे. 'यांना हवेचेच पैसे देतो आपण', 'ते दोन चिप्स तरी कशाला द्यायचे?' या आणि अशा अनेक कमेंट्स करत अनेकांनीच नाराजीचा सूर आळवला. तुमच्यासोबत लेसच्या पाकिटात कमी चिप्स मिळाल्याची घटना कधी घडलीये?