राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये नवा फॉर्म्युला?

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला देशभरात आणि राहुल गांधींना अमेठी मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागल्यामुळे पक्षात निराशेचं वातावरण आहे

Updated: May 29, 2019, 11:28 AM IST
राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये नवा फॉर्म्युला? title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाला सात दिवस उलटले तरी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचं विनोदी नाट्य सुरूच आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर राहुल गांधी ठाम आहेत. याचा अर्थ ते कोणाचंही ऐकणार नाहीत हे आता स्पष्ट झालंय. पण पुढचा अध्यक्ष निवडला जाईपर्यंत ते ही जबाबदारी सांभाळण्यास तयार आहेत. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे. राहुल गांधी ठाम राहिल्यामुळे आता अध्यक्षपदाच्या नव्या फॉर्म्युलाचा विचार पक्षात सुरू आहे. 

एक अध्यक्ष आणि चार कार्यकारी अध्यक्ष असा नवा फॉर्म्युला पुढे येण्याची शक्यता आहे. चार कार्यकारी अध्यक्ष देशभरात फिरून पक्षाच्या प्रचार-प्रसाराचं काम पाहतील. सूत्रांच्या माहितीनुसार, मनमोहनसिंग यांच्याकडे अध्यक्षपद सोपवलं जाण्याची शक्यता आहे. त्याशिवाय सध्या कॅप्टन अमरिंदरसिंग, ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, शशी थरूर, ए. के. अँटनी यांची नावं अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.  

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला देशभरात आणि राहुल गांधींना अमेठी मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागल्यामुळे काँग्रेस पक्षात निराशेचं वातावरण आहे. अनेक छोटे-मोठे नेते पक्षाला राम-राम ठोकण्याच्या तयारीत आहेत. अशावेळी राहुल गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय पक्क केलाय. सहकारी पक्ष द्रमुख आणि पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना आपला राजीनामा परत घेण्याचा आग्रह केला. परंतु, ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत.