मनोहर पर्रिकर यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही- मोदी

पर्रिकर हे आधुनिक गोव्याचे शिल्पकार होते.

Updated: Mar 17, 2019, 10:19 PM IST
मनोहर पर्रिकर यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही- मोदी title=

नवी दिल्ली: गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. मोदींनी ट्विटरवरून पर्रिकर यांना श्रद्धांजली वाहिली. या संदेशात मोदींनी म्हटले आहे की, मनोहर पर्रिकर यांच्याशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. ते एक खरे देशभक्त आणि अतुलनीय प्रशासक होते. सर्वांनाच त्यांच्या कामाचे कौतुक वाटायचे. त्यांची नि:स्पृह देशसेवा आगामी पिढ्यांच्याही कायम स्मरणात राहील. पर्रिकर हे आधुनिक गोव्याचे शिल्पकार होते. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळेच गोव्यात अनेक वर्षे त्यांचे वर्चस्व राहीले, असे मोदींनी म्हटले आहे. 

पंतप्रधान मोदी यांच्यासोबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासह संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, नितीन गडकरी, काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही पर्रिकरांना श्रद्धांजली वाहिली आहे.

पर्रिकर यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सोमवारी देशभरात दुखवटा पाळला जाईल. या काळात दिल्लीसह इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राजधानीमध्ये राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येईल. तसेच पर्रिकर यांच्यावर उद्या गोव्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. 

गोव्यातील म्हापशात १३ डिसेंबर १९५५ ला मनोहर पर्रिकर यांचा जन्म झाला होता. मुंबई आयआयटीमधून पर्रिकर इंजिनिअर झाले. शालेय जीवनापासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सक्रिय होते. १९९४ मध्ये पर्रिकर पणजीमधून आमदार झाले. त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री झाले. मोदी सरकारमध्ये देशाचे संरक्षणमंत्री झाले. स्वच्छ प्रतिमा आणि साध्या राहणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या पर्रिकर यांनी २००० ते २००५, २०१२ ते २०१४ आणि १४ मार्च २०१७ पासून निधनापर्यंत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून गोवा राज्याची धुरा सांभाळली. २०१४ ते २०१७ दरम्यान त्यांनी संरक्षण मंत्रिपद सांभाळले.