Train Accident : तामिळनाडूतील (Tamil Nadu) मदुराई (Madurai railway junction) रेल्वे स्थानकाजवळ एका ट्रेनला आग लागल्याची घटना समोर आली आहे. मदुराई येथील रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लखनऊहून रामेश्वरमला जाणाऱ्या ट्रेनच्या पर्यटक डब्यात आग लागून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीची घटना पहाटे 5.15 च्या सुमारास मदुराई यार्ड जंक्शनवर थांबली असताना घडली आहे. डब्याला लागलेली आग खूप भीषण होती आणि अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तामिळनाडूतील मदुराई रेल्वे जंक्शनवर शनिवारी उभ्या असलेल्या एक्स्प्रेस ट्रेनला लागलेल्या आगीत किमान आठ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आयआरसीटीसी (IRCTC) टुरिस्ट ट्रेनच्या डब्यांना ही भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना मोठी कसरत करावी लागत होती. दरम्यान, तामिळनाडूचे मंत्री पी मूर्ती यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
मदुराई रेल्वे स्थानकावर थांबलेल्या ट्रेनच्या डब्याला आग लागून आठ जणांना जीव गमवावा लागला. प्राथमिक तपासात ट्रेनमध्ये स्वयंपाक केल्याचे समोर आले आहे. मदुराई बोडी लाईन परिसरात रेल्वेच्या डब्यात लागलेली आग विझवण्याचे काम अग्निशमन विभाग करत आहे. दक्षिण भारतात दर्शन घेण्यासाठी 60 हून अधिक यात्रेकरू 17 ऑगस्ट रोजी लखनऊ, उत्तर प्रदेश येथून ट्रेनने तामिळनाडूत आले होते. शुक्रवारी नागरकोइल येथील पद्मनाभ स्वामी मंदिरात स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर ते शनिवारी पहाटे मदुराईला पोहोचले. मदुराई रेल्वे स्थानकापासून सुमारे 1 किमी अंतरावर त्यांच्या ट्रेनचा डबा थांबवण्यात आला आणि त्यावेळी रेल्वेच्या डब्यातील भाविकांनी सिलेंडरने स्वयंपाक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आग लागल्याने संपूर्ण बोगीने पेट घेतला.
8 persons killed, 20 injured in TN train fire mishap: Official
— Press Trust of India (@PTI_News) August 26, 2023
दरम्यान, आगीचा व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये डब्याला भीषण आग लागल्याचे दिसत असून काही लोक आजूबाजूला ओरडत आहेत. यादरम्यान शेजारील रेल्वे ट्रॅकवरून एक ट्रेनही जात आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. यादरम्यान ट्रेनचा डबा जळालेला दिसत आहे. या भीषण दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून 20 प्रवासी गंभीर जखमी आहेत.