सलूनपासून सुरुवात केली आता ६०० लक्झरी गाड्यांचा मालक

रमेशबाबू यांना यंदाच्या झी बिझनेसच्या 'डेअर टू ड्रीम' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Updated: Dec 20, 2018, 01:40 PM IST
सलूनपासून सुरुवात केली आता ६०० लक्झरी गाड्यांचा मालक title=

नवी दिल्ली - अनेक लोकांचा जीवनप्रवास इतरांसाठी प्रेरणादायी असतो. कष्टाच्या जोरावर यश मिळवणारे इतरांसाठीही आदर्श ठरतात. अशीच कहाणी आहे बंगळुरूचे रमेश बाबू यांची. वयाच्या १४ व्या वर्षी सलूनमध्ये दाढी-कटिंग करण्याच्या कामाला रमेश बाबूंनी सुरुवात केली. पण कष्टाच्या जोरावर आज ते कोट्यधीश असून, त्यांच्याकडे ६०० लक्झरी कार्सचा ताफा आहे. 

वयाच्या सातव्या वर्षी रमेशबाबूंच्या डोक्यावरील पित्याचे छत्र हरपले. त्यांचा सलूनचा छोटा व्यवसाय होता. घरात एकदम गरिबीची परिस्थिती होती. त्यामुळे कुटुंबियांपुढे घर चालवण्याचा प्रश्न निर्माण झाला. सुरुवातीला वडिलांचे सलून प्रतिदिन पाच रुपयाने भाड्याने देण्यात आले. नंतर स्वतः रमेशबाबू यांनी सलूनचा व्यवसाय सुरू केला. पण त्यातून फारसे उत्पन्न मिळत नसल्यामुळे त्यांनी २००४ मध्ये लक्झरी कार भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला छोट्या छोट्या ग्राहकांना या गाड्या भाड्याने दिल्या जायच्या. त्यानंतर त्यांनी ई क्लास मर्सिडिज घेतली आणि ती सुद्धा भाड्याने द्यायला सुरुवात केली. त्यावेळी अशा पद्धतीने लक्झरी गाड्या भाड्याने दिल्या जात नव्हत्या. त्यामुळे रमेशबाबू यांच्या व्यवसायाला गती मिळाली. त्यांच्या गाड्यांना मागणी वाढू लागली. 

रमेशबाबू यांना यंदाच्या झी बिझनेसच्या 'डेअर टू ड्रीम' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आता देशातील अनेक सेलिब्रिटीही रमेशबाबू यांच्याकडून लक्झरी कार भाड्याने घेतात. यामध्ये अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, सचिन तेंडुलकर, आमिर खान यांचा समावेश आहे. दिल्ली, चेन्नई आणि बंगळुरूमध्ये रमेश टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सच्या तीन शाखा आहेत. आज त्यांच्याकडे ३०० जण काम करतात. ज्यामध्ये १९० वाहनचालक आहेत.