नवी दिल्ली : कोलासिब जिल्ह्यातील वैरेंगते शहराच्या सीमा भागात झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात मिझोराम पोलिसांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा, चार वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली. Assam-Mizoram Border Clash
मिझोरामचे पोलीस महानिरीक्षक जॉन एन यांनी सांगितले की, या लोकांविरोधात खुनाचा प्रयत्न आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते म्हणाले की, राज्य पोलिसांकडून सोमवारी रात्री उशिरा वैरेंगते पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली होती, कारण सीमा नगरजवळ मिझोराम आणि आसाम पोलीस दलांमध्ये हिंसक चकमक झाली. ते म्हणाले की, आसाम पोलिसांच्या 200 अज्ञात जवानांविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. Mizoram Police File FIR against Assam CM Himanta Sarma
आसाम पोलिसांनी मिझोराम सरकारच्या सहा अधिकाऱ्यांना समन्स बजावले आहे, ज्यात कोलासिब जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि उपायुक्त यांना सोमवारी धोलाई पोलीस ठाण्यासमोर हजर राहण्यासाठी बोलावले आहे. आसाम पोलिसांच्या एका सूत्राने शुक्रवारी सांगितले की, या अधिकाऱ्यांना 28 जुलै रोजी समन्स जारी करण्यात आले होते.
26 जुलै रोजी कछार जिल्ह्यातील लैलापूर येथे आसाम आणि मिझोराम पोलीस दलांमध्ये रक्तरंजित चकमक झाली, ज्यात आसामचे पाच पोलीस कर्मचारी आणि एक रहिवासी ठार झाला, तर 50 हून अधिक जखमी झाले. या प्रकरणी धोलाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.