Ravi Rana | "राज ठाकरे हे तर....", रवी राणा यांचं मनसेप्रमुखांना सडेतोड प्रत्त्युत्तर

मनसेप्रमुखांनी राणा दाम्पत्य (Rana Couple) आणि संजय राउत (Sanjay Raut) यांच्यावर लडाख दौऱ्यांवरुन टीका केली. या टीकेनंतर आमदार राणा यांनी आरोप केले आहेत. तसेच राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्तुतर दिलं.

Updated: May 22, 2022, 05:14 PM IST
Ravi Rana | "राज ठाकरे हे तर....", रवी राणा यांचं मनसेप्रमुखांना सडेतोड प्रत्त्युत्तर title=

रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली :  मनसेप्रमुख राज ठाकरे (Mns Chief Raj Thackeray) यांनी आज पुण्यात गणेश कला मंच येथे जाहीर सभा घेतली. या सभेत मनसेप्रमुखांनी राणा दाम्पत्य (Rana Couple) आणि संजय राउत (Sanjay Raut) यांच्यावर लडाख दौऱ्यांवरुन टीका केली. या टीकेनंतर आमदार राणा यांनी आरोप केले आहेत. तसेच राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्त्युत्तर ही दिलं. (mla ravi rana critisized to mns chief raj thackeray) 

राणा यांचे मनसेप्रमुखांवर आरोप

"राज ठाकरे हे मॅच फिक्सिंग करतात. राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत मॅच फिक्सिंग करतात. हनुमान चालिसा म्हटल्यावर आमच्यावर गुन्हा दाखल होतो. पण राज ठाकरेंवर गुन्हा दाखल का होत नाही", असा सवाल रवी राणा यांनी उपस्थित केला.

"हनुमान चालिसा म्हटल्यावर आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. तेव्हा राज ठाकरे यांनी एक अवाक्षरही काढलं नाही. राज ठाकरे प्रक्षोभक भाषण करतात. पण त्यांच्यावर एक गुन्हा दाखल होत नाही. उद्धव ठाकरे सरकार सोबतच राज ठाकरेंचं मॅच फिक्सिंग आहे. माझा जन्म ठाकरे कुटुंबात नव्हे तर सर्वसामान्य कुटुंबात झाला", असं म्हणत राणा यांनी पलटवार केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची आठवण करुन देण्यासाठी राणा दाम्पत्यानी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा वाचण्याचा निर्धार केला होता. यावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापलं. यानंतर जे काही राजकीय नाट्य रंगलं ते सर्वांनी पाहिलं. 

यानंतर काही दिवसांपूर्वी राणा दाम्पत्य आणि राऊत यांचे एकत्र असल्याचे फोटो व्हायरल झाले. या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत राणा दाम्पत्य आणि राऊत यांच्यावर टीका केली. या टीकेला राणा यांनी प्रत्त्युत्तर दिलं.

आम्ही संस्कृती जपली

"माझ्या आणि संजय राऊतांच्या भेटीवर प्रश्न उपस्थित केला जातो. पुण्यात शरद पवारांचा हात धरून राज ठाकरे स्टेजवर घेऊन आले. हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे. तीच संस्कृती आम्ही महाराष्ट्राबाहेर पाळली" असं उत्तर राणा यांनी राऊत यांच्या सोबतच्या फोटोवरुन करण्यात आलेल्या टीकेला दिलं.

राज ठाकरेंना सवाल

राज ठाकरेंनी कितीदा यु-टर्न घेतला एकदा पाहावं. तसेच राज ठाकरे शेतकऱ्यांसाठी कधी जेलमध्ये गेले आहेत का, असा सवालही आमदार राणा यांनी राज ठाकरेंना केला. दरम्यान आता या टीकेवरुन मनसेकडून काय उत्तर दिलं जातं, याकडे लक्ष असणार आहे. 

राज ठाकरे काय म्हणाले होते? 

"मी सांगितलं काय होतं की, जर मशिदीबाहेर जोरात भोंगे वाजले तर त्याच्यासमोर हनुमान चालिसा लावा. अनेक ठिकाणी लावली गेली. हे राणा दाम्पत्य उठलं आणि मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा लावण्याचं बोलू लागले. त्यानंतर राणा दाम्पत्याला अटक झाली. मग ते जेलमध्ये होते. मग ते मधू इथे चंद्र तिथे. या सर्व गोष्टींनंतर ते एकत्र आले त्यांना सोडून देण्यात आलं.

शिवसेनेकडून राणा दामप्त्याविरोधात नको नको ते बोलण्यात आलं. शिवसेनेकडूनही त्याच भाषेत बोललं गेलं. इतका सर्व राडा तुम्ही सर्वांनी टीव्हीवर पाहिला. त्यानंतर लडाखमध्ये ते दाम्पत्य आणि संजय राऊत एकत्र जेवताना दिसले. शिवसैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना या सर्व गोष्टींचं काहीच वाटत नाही का", अशा शब्दात राज ठाकरेंनी टीका केली होती.