Modi Government News : केंद्रावर एकिकडून अनेक मुद्द्यांच्या धर्तीवर विरोधक सातत्यानं निशाणा साधत असतानाच सर्वसामान्यांनीही असाच सूर आळवला होता. आता मात्र हा विरोध काहीसा मावळताना दिसत आहे. किंबहुना केंद्राच्या एका निर्णयामुळं येत्या काळात काही महत्त्वाच्या गोष्टींची खरेदी करु पाहणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
येत्या काळात तुम्हीही विद्युत उपकरण खरेदी करु पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतीशय महत्त्वाची कारण, इथून पुढं Electronic उपकरणांवर असणारा जीएसटी कमी करण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर आता मोबाईल, टीव्हीचेही दर कमी होणार आहेत. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे यापूर्वी टीव्ही आणि मोबाईलवर 31.3 टक्के GST आकारला जात होता. आता मात्र हा दर 12 ते 18 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. परिणामी मोबाईलचे दर 19 टक्क्यांनी कमी झाले आहेत. हे नवे दर 1 जुलै 2023 पासून लागू करण्यात आले आहेत.
जीएसटीचे दर कमी होण्यापूर्वी 27 इंचांच्या टीव्हीसाठी साधारण 32 हजार किंवा त्याहून जास्त किंमत मोजावी लागत होती. आता मात्र तुम्ही अशा टीव्हीची खरेदी करत असाल, तर त्यासाठी 29 हजार रुपयेच भरावे लागणार आहेत. बरं, त्याहून जास्त मोठा टीव्ही घेत असाल तर तुम्हाला 27 इंचांच्याच टीव्हीइतकी किंमत खर्च करावी लागणार आहे. मोबाईलचं म्हणाल तर, आधी 32 हजारांच्या किंमतीत मिळणारा मोबाईलही 28 हजारांच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळं एसी, मोबाईल, टीव्ही किंवा फ्रिज या वस्तुंच्या किंमती तुम्हाला घाम फोडणार नाहीत.
केंद्राच्या एका निर्णयामुळं फ्रिज, गिझर, वॉशिंग मशीन, पंखा, कूलर, एलपीजी स्टोव्ह, गृहोपयोगी उपकरणं, मिक्तर या आणि अशा तत्सम गोष्टींवर आता 18 ऐवजी 12 टक्के जीएसटी आकारला जाईल ज्यामुळं त्यांचे दरही कमीच असतील. व्हॅक्यूम क्लिनरवरील जीएसटीसुद्धा 28 टक्क्यांवरून 18 टक्क्यांवर आला आहे. ज्यामुळं या किमतीही कमी झाल्या आहेत. केंद्राच्या अर्थमंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मोबाईल खरेदी करत असताना ग्राहकांना 31.3 टक्क्यांऐवजी 12 टक्के कर भरावा लागणार आहे. त्यामुळं हे दरही कमी झाल्यामुळं आता मोबाईल खरेदीसाठीची प्रतीक्षा संपली असंच म्हणावं लागेल.