PM Modi in Shillong: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आज मेघालय (Meghalaya) आणि नागालॅण्डमधील (Nagaland) विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांमध्ये प्रचारसभा घेतल्या. त्यांनी मेघालयची राजधानी शिलाँगमध्ये एका रोड शोला संबोधित केलं. त्यानंतर त्यांनी तुरा येथे प्रचारसभेला संबोधित केलं. मेघालय आणि नागालॅण्डमध्ये एकूण 60 जागांवर 27 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. पंतप्रधान मोदींनी शिलाँगमधील सभेत ईशान्येकडील लोकांमध्ये मतभेद निर्माण करण्याचे प्रयत्न झाले मात्र आम्ही लोकांमध्ये एकोपा निर्माण केला असं म्हणाले. ज्यापद्धतीने आज तुम्ही या रोड शोला हजेरी लावली आहे. तुमचं हे प्रेम, तुमचे हे आशिर्वाद या सर्वांची मी नक्की परत फेड करेन. तुमच्या या प्रेम आणि आशिर्वादाचं कर्ज मी मेघालयचा विकास करुन फेडेन. मी तुमच्यासाठीच्या कल्याणकारी कामांना वेग देऊन हे कर्ज फेडेन. तुम्ही दिलेलं हे प्रेम मी वाया जाऊ देणार नाही, असं आश्वासन मोदींनी येथील जनतेला दिलं.
पंतप्रधान मोदींनी, "मेघालय हे केंद्र सरकारच्या अॅक्ट इस्ट पॉलिसीचा महत्त्वाचा स्तंभ आहे. मेघालयला आता असं सरकार हवं आहे जे कुटुंबवादाऐवजी लोकांना पहिलं प्राधान्य देईल. मेघालयच्या कानाकोपऱ्यात रचनात्मकता आहे. आपल्या राज्याच्या संस्कृतीवर गर्व करणारे लोक इथं आहेत. भारत यशाची नवी शिखरं गाढत असताना यामध्ये मेघालयचेही योगदान महत्त्वाचे आहे," असं म्हटलं. आपल्या भाषणामध्ये मोदींनी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवरही टीका केली. "काही लोक ज्यांना देशाने नाकारलं आहे ते आज उदास आहेत. आता ते लोक म्हणत आहेत 'मोदी तेरी कबर खुदेगी' मात्र देशातील जनता, 'मोदी तेरा कमल खिलेगा' असं म्हणत आहेत," असा टोला मोदींनी लगावला. पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीतील आयजीआय विमानतळावर केलेल्या घोषणाबाजीच्या पार्श्वभूमीवर हे विधान केलं.
#WATCH | Some people who have been rejected by the country are immersed in sadness and are now saying 'Modi teri kabar khudegi' but the people of the country are saying 'Modi tera kamal khilega': PM Narendra Modi, in Shillong pic.twitter.com/ZfyKaPg2F9
— ANI (@ANI) February 24, 2023
"या रोड शोच्या फोटोंनी देशाच्या कोन्याकोन्यात तुमचा संदेश पोहचलवा आहे. मेघालयमध्ये चारही दिशांना भाजपाच दिसत आहे. पर्वत असो किंवा मैदान, गावं असो किंवा शहरं सगळीकडे कमळ फुलताना दिसत आहे. मेघालयच्या हितांना कधीच प्राधान्य देण्यात आलं नाही. छोट्या छोट्या मुद्द्यांवरुन तुमच्यात फूट पाडण्यात आली. या राजकारणामुळे तुमचं फार नुकसान झालं आहे. येथील तरुणांना फार नुकसान झालं आहे. तरुणांकडून, महिलांकडून, व्यापाऱ्यांकडून, सरकारी कर्मचाऱ्यांकडून भाजपाचेच सरकार हवे अशी मागणी होताना दिसत आहे. मेघालयबरोबरच ईशान्य भारतामध्ये भाजपासाठी जो वाढता पाठिंबा दिसत आहे तो काही कुटुंबांच्या स्वार्थी कामांचा परिणाम आहे," असा टोला मोदींनी विरोधकांना लगावला.