मोदींनी दिल्यात झारखंड विजयाबद्दल हेमंत सोरेन यांना शुभेच्छा

 मोदी यांनी झारखंड मुक्ती मोर्चा आणि आघाडीचे नेते हेमंत सोरेन यांचे अभिनंदन केले आहे.  

Updated: Dec 23, 2019, 08:20 PM IST
मोदींनी दिल्यात झारखंड विजयाबद्दल हेमंत सोरेन यांना शुभेच्छा title=
संग्रहित छाया

मुंबई : झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-राजद आघाडीने बाजी मारली. भाजपला सत्तेतून पाय उतार केले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड मुक्ती मोर्चा आणि आघाडीचे नेते हेमंत सोरेन यांचे अभिनंदन केले आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मोदी यांनी ट्विट करताना म्हटले आहे, झारखंड निवडणुकीच्या विजयासाठी हेमंत सोरेनजी, झामुमोच्या नेतृत्वाखालील युतीला आणि त्यांना राज्याची सेवा करण्यासाठी शुभेच्छा आणि अभिनंदन. दरम्यान, राज्यात भाजपचा मोठा पराभव झाला आहे. मागील निवडणुकीत ३६ जागा जिंकलेल्या भाजपला यावेळी २३ जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपला जोरदार  फटका  बसला आहे.

झारखंड विधानसभा निवडणुकीत पराभव पदरी आल्याने सत्तेतून पायउतार व्हाव्या लागणाऱ्या भाजपच्या जागाही दुपटीने घटल्या आहेत.  तर काँग्रेस, जेएमएम आणि राजदला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तब्बल ४७ जागांवर तिन्ही पक्षांचे उमेदवार आघाडीवर आहेत. महाराष्ट्रात धनुष्यबाण आणि पंजा एकत्र आले आणि सत्तांतर झाले. याच नाट्याची प्रचिती झारखंडमध्येही दिसून आली आहे. झारखंड विधानसभेच्या ८१ जागांसाठी निवडणूक झाली. यात काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चानं (जेएमएम) भाजपला पराभवाची धूळ चारली. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवणाऱ्या भाजपची सुरूवातीपासूनच दमछाक झाली.  

काँग्रेसची निशाणी हाताचा पंजा असून, जेएमएमची निशाणी धनुष्यबाण आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापासूनच जेएमएमचे नेते हेमंत सोरेन यांनी भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.  तर दुसरीकडे  झारखंडमध्ये काँग्रेसने जुळत घेत झारखंड मुक्ती मोर्चा आणि लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत आघाडी केली. तिन्ही पक्ष एकत्र आल्यानं सत्ताधारी भाजपविरोधात वरचढ ठरले.

या निवडणुकीत भाजपने एनआरसी, सुधारित नागरिकत्व कायदा, तिहेरी तलाक यासारखे राष्ट्रीय स्तरावरील मुद्यांवर भर दिला. तर काँग्रेस आघाडीने पाणी, जंगल, जमीन याच मुद्यावर भर दिला. याचा आदिवासी बहुल मतदार असलेल्या झारखंडमध्ये प्रभाव दिसून आला आणि भाजपला सत्तेवरून पायउतार व्हावे लागले आहे.