ऑफिसवरुन घरी जाणाऱ्या महिलेशी धावत्या स्कुटीवर छेडछाड! Dash Cam मध्ये रेकॉर्ड झाला Video

Molestation Of Women On Scooter Video: हा धक्कादायक व्हिडीओ ही महिला जात असलेल्या रस्त्यावर तिच्या मागे धावत असलेल्या कारच्या डॅशबोर्ड कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला आहे. यावर पोलिसांनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 2, 2024, 03:58 PM IST
ऑफिसवरुन घरी जाणाऱ्या महिलेशी धावत्या स्कुटीवर छेडछाड! Dash Cam मध्ये रेकॉर्ड झाला Video
पोलिसांनी व्हिडीओला दिला रिप्लाय (फोटो व्हिडीओवरुन स्क्रीन ग्रॅब)

Molestation Of Women On Scooter Video: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्या माध्यमातून उत्तर प्रदेशमधील कायदा सुव्यवस्थेची स्थिती किती चिंताजनक आहे हे दिसून येत असल्याची टीका अनेकांनी केली आहे. हा व्हिडीओ एका धावत्या वाहनातील डॅश कॅमेरामध्ये कैद झाला आहे. कॅमेरात कैद झालेला हा घटनाक्रम फारच धक्कादायक आहे.

Add Zee News as a Preferred Source

नेमकं घडलं काय?

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये चक्क एका धावत्या दुचाकीवरील तरुणीची छेड काढण्यात आल्याचं दिसत आहे. सदर प्रकार हा राजधानीच्या शहरातील शहीद पथवर घडल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडीओमध्ये एक तरुणी तिच्या स्कुटीवरुन रात्रीच्या वेळी रस्त्यावरुन जात असताना तिच्या मागून बाईकवरुन आलेला एक तरुण तिची छेड काढतो. मागून बाईकवरुन आलेला हा तरुण स्कुटीवरुन जात असलेल्या तरुणीच्या जवळ येतो आणि तिला स्पर्श करुन निघून जातो. हा संपूर्ण प्रकार एका कारच्या डॅशबोर्डवरील कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला आहे. 

याला जबाबदार कोण?

मनोज शर्मा नवाच्या व्यक्तीने आपल्या अधिकृत एक्स (आधीचं ट्वीटर) हॅण्डलवरुन शेअर केलेल्या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये, "शहीद पथवर स्कुटीवरुन जाणाऱ्या तरुणीबरोबर बाईकवरुन जाणाऱ्या तरुणाने छेड काढली. या तरुणावर योग्य तो इलाज करण्याची गरज आहे," असं म्हणत लखनऊ पोलिसांना टॅग केलं आहे. "महिलांविरुद्ध होणाऱ्या या गुन्ह्यांसाठी कोणाला जबाबदार ठरवावं?" असा सवालही मनोज शर्मा यांनी विचारलं आहे. वेगात आलेल्या या दुचाकीस्वाराने तरुणीच्या कंबरेजवळ हात लावला आणि तसाच पुढे निघून गेला. या बाईकस्वाराच्या बाईकचा क्रमांक पोलिसांना सापडला आहे. पीडित महिला रात्री ऑफिसवरुन घरी जात असताना तिच्याबरोबर हा प्रकार घडला असून घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

पोलिसांनी दिला रिप्लाय

पीडित तरुणीने या प्रकरणी पोलिसांकडे अधिकृत तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. दरम्यान व्हायरल झालेल्या या व्हिडीओच्या पोस्टवर लखनऊ पोलिसांनी रिप्लाय केला आहे. "या प्रकरणामध्ये बिजनौर पोलीस स्टेशनमध्ये योग्य कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तपास सुरु करण्यात आला आहे," असं लखनऊ पोलिसांनी म्हटलं आहे.

महिला दुचाकीवरही सुरक्षित नाहीत

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता महिला आपल्या वाहनांमध्ये आणि दुचाकीवरही सुरक्षित नसल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More