मुंबई : RBI Imposes Monetary Penalty On Bank of Maharashtra : ग्राहकांचे हित लक्षात घेऊन, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) वेळोवेळी बँकांवर कारवाई करत असते. RBI ने आता 'Know Your Customer' (KYC) आणि इतर सूचनांचे पालन करण्यात चूक केल्याबद्दल बँक ऑफ महाराष्ट्रला (Bank of Maharashtra) 1.12 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
जोखीम व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वे, केवायसीशी (KYC) संबंधित नियम आणि बँकांद्वारे वित्तीय सेवांच्या आउटसोर्सिंगमधील नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल केंद्रीय बँकेने बँक ऑफ महाराष्ट्रवर (Bank of Maharashtra) हा मोठा दंड ठोठावला आहे.
आरबीआयने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, बँकेचे वैधानिक निरीक्षण आणि देखरेख मूल्यांकन (ISE) 31 मार्च 2020 रोजीच्या आर्थिक स्थितीनुसार केले गेले. याशिवाय सीमाशुल्क सरकारच्या खात्यात जमा करण्यात आले नसल्याबद्दलही बँकेकडून चौकशी करण्यात आली.
आणखी एका माहितीनुसार, केंद्रीय बँकेने सांगितले की ठेवीवरील व्याज दराबाबत आदेशांचे पालन न केल्याबद्दल राजकोट नागरी सहकारी बँकेला 12 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. यापूर्वी केंद्रीय बँकेने सेंट्रल बँक ऑफ इंडियावर (सीबीआय) दंड ठोठावला होता.
ग्राहकांच्या संरक्षणाशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आरबीआयने सेंट्रल बँकेला 36 लाखांचा दंड ठोठावला होता. आरबीआयने दिलेल्या माहितीत असे सांगण्यात आले की त्याची चौकशी करण्यात आली आणि बँकेला 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली, त्यानंतर आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, केंद्रीय बँक आरबीआय या उत्तराने समाधानी नाही. ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सीबीआयने नियमांचे पालन केले नसल्याचे आरबीआयने म्हटले आहे. त्याआधारे आरबीआयने ही कारवाई केली आहे.