Maharashtra Monsoon News : उन्हानं संपूर्ण महाराष्ट्राला तीव्र झळांच्या अग्निकुंडातच लोटलं आहे असं म्हणायला हरकत नाही. राज्यात सध्या तापमानाचा आकडा पाहता एखाद्या भट्टीत आपण वावरतोय असाच भास अनेकांना होतो. याच उन्हाच्या तडाख्यात सर्वाधिक दिलासा देणारी बातमी नुकतीच समोर आली असून, ही बातमी आहे मान्सूनची.
हवामान विभागाच्या माहितीनुसार पॅसिफिक महासागरात सक्रिय असणाऱ्या अल निनो या प्रणालीची ताकद मंदावणार असून, आला ‘ला-निना’ही स्थिती सक्रिय होणार आहे. ज्याचा थेट परिणाम देशाकतील मान्सूनवर दिसणार आहे. जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांमध्ये देशात सामान्यपेक्षा अधिक पर्जन्यमानाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पॅसिफिक इकॉनॉमिक को -ऑपरेशनच्या (अपेक) हवामान विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
भारतात मान्सून नेमका कधीपर्यंय येणार आणि त्याचा प्रवास कसा असणार यासंदर्भातील हा पहिलाच अंदाज ठरत आहे. ‘अपेक’च्या माहितीनुसार जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांमध्ये देशात सरासरीहून जास्त पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. त्यामुळं यंदाचे हे तीन महिने पाऊस गाजवणार आणि दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या महाराष्ट्राला दिलासा मिळणार हे चित्र स्पष्ट होत आहे.
अपेकच्या अंदाजानुसार आफ्रिकेचा पूर्व भाग, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, कॅरेबियन समुद्र, अटलांटिकचा उष्ण कटिबंदीय भाग, इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण भागांमध्ये सरासरीहून अधिक पावसाची शक्यता आहे. आशिया खंडाच्या पूर्वेलाही सरासरीहून अधिक पावसाची शक्यता अपेककडून वर्तवण्यात आली आहे. हवामानाचाच आणखी एक भाग असणाऱी एन्सो ही प्रणाली अपेककडून 15 एप्रिलपासून सुरु करण्यात आली. ज्याअंतर्गत 'ला निना'साठी पूरक परिस्थिती निर्माण होत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तेव्हा आता येत्या काळात मान्सूनसंदर्भात इतर हवामान संस्था नेमक्या कसा अंदाज वर्तवतात आणि या मान्सूनचा प्रवास नेमका कसा सुरु राहतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.