नवी दिल्ली: कोरोना व्हायरसच्या Coroanvirus वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असतानाच ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्राध्यापक आणि साथरोग तज्ज्ञ सुनेत्रा गुप्ता यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण भाकीत वर्तविले आहे. यामुळे भारताला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सुनेत्रा गुप्ता यांनी 'हिंदुस्थान टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, जगातील अनेक लोकांना कोरोनातून बरे होण्यासाठी लसीचीही गरज पडणार नाही. या आजाराचे स्वरुप साध्या तापाप्रमाणे आहे. त्यामुळे ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे आणि ज्यांना इतर कोणत्याही व्याधी नाहीत, त्यांनी कोरोनामुळे चिंतीत होण्याचे कारण नाही.
अरे बापरे... देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ
भविष्यात कोरोनावर लस सापडली तरी त्याचा उपयोग आजाराचा धोका जास्त असलेल्या रुग्णांसाठी होईल. आपल्यापैकी अनेकांना कोरोनाची चिंता करण्याचे कारण नाही. तसेच कोरोनाची साथ ही नैसर्गिकरित्या संपुष्टात येईल. मात्र, भविष्यात कोरोना हा तापाप्रमाणेच आपल्या जीवनाचा एक भाग असेल, असेही सुनेत्रा गुप्ता यांनी सांगितले. यावेळी सुनेत्रा गुप्ता यांनी कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा तितकासा प्रभावी उपाय नसल्याचे मतही व्यक्त केले. लॉकडाऊनमुळे थोड्या काळासाठी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो. मात्र, दीर्घकालीन विचार करता लॉकडाऊन फायदेशीर ठरणार नाही, असे त्यांनी सांगितले.
तसेच कोरोनाची दुसरी लाट वैगेरे आल्याचा दावाही त्यांनी फेटाळून लावला. जगाच्या अनेक भागात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ही दुसरी लाट नसून ज्या प्रदेशांमध्ये आतापर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव झाला नव्हता, त्याठिकाणी कोरोनाचा पहिल्यांदा शिरकाव झाल्याचे लक्षण आहे. जगातील ज्या देशांमध्ये आतापर्यंत लॉकडाऊन यशस्वीपणे राबवण्यात आला त्याठिकाणी आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत असल्याचे मतही सुनेत्रा गुप्ता यांनी व्यक्त केले. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे २०,९०३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६,२५,५४४ वर जाऊन पोहोचली आहे.