भोपाळ : मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एका महिलेने आपल्या मुलाला गोरं करण्यासाठी दगडाने घासलं, या मुलाला तिने एवढं दगडाने घासलं की, त्याला अनेक ठिकाणी जखमा झाल्या. मनगट, खांदा, पाठ आणि पायांना या मुलाला जखम झाली आहे. विशेष म्हणजे आरोपी महिला ही शिक्षिका आहे. तिचे पती खासगी रूग्णालयात कामाला आहेत, या मुलाला उत्तराखंडच्या मातृछायामधून दत्तक घेण्यात आलं आहे, अशी माहिती तक्रारदार शोभना शर्मा यांनी दिली आहे.
आपल्या दत्तक मुलाला गोरं करण्यासाठी सुधा तिवारी महिलेने त्याच्या शरीरावर, काही ठिकाणी लहान दगडाने घासत होती, अषी माहिती चाईल्ड हेल्पलाईनला मिळाली. या महिलेच्या मोठ्या बहिणीच्या मुलीने ही माहिती चाईल्ड हेल्पलाईनला दिली. यानंतर चाईल्ड हेल्पलाईनने पोलिसांच्या मदतीने या मुलाची सुटका केली.
सुधा तिवारीला कुणीतरी सल्ला दिला होता, की तुझ्या मुलाला काळ्या रंगाच्या दगडाने घास, असं केलं तर तुझा मुलगा गोरा होईल. सुधाला या मुलाचा सावळा रंग पटत नव्हता, म्हणून सुधाने त्याला काळ्या दगडावर घासायला सुरूवात केली, पण त्याला शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या, असं तक्रारदार महिलेने म्हटलं आहे.
हमीदिया हॉस्पिटलमध्ये मुलाची सुटका केल्यानंतर त्याला दाखल करण्यात आले. यानंतर, प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला चाईल्ड हेल्पलाईनकडे सोपवण्यात आलं आहे.