Crime News : मध्य प्रदेशच्या (MP News) ग्वाल्हेर शहरातून ॲसिड हल्ल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शारिरीक शोषण (Physical abuse) केल्याचे आरोप करत एका प्रेयसीने विवाहित प्रियकराच्या पत्नीवर ॲसिड हल्ला (Acid Attack) केला आहे. या हल्ल्यात प्रियकराची पत्नी गंभीररित्या भाजली असून पतीदेखील जखमी झाला आहे. दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या हल्ल्यानंतर तरुणीने पोलीस (MP Police) ठाणे गाठून प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे, ॲसिड हल्ला प्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनकगंज पोलिसांनी दोन्ही बाजूंकडून एफआयआर नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
गुरुवारी संध्याकाळी जनकगंजमधील रामद्वारा भागात ही धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. ब्युटीपार्लरमध्ये काम करणाऱ्या प्रेयसीने प्रियकराच्या पत्नीला गाठून तिच्यावर ॲसिड हल्ला केला. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली आहे. पत्नीला वाचवण्याच्या प्रयत्नात पती देखील जखमी झाला आहे. या हल्ल्यानंतर दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील माहिती पोलिसांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच आरोपी तरुणीने तिच्या प्रियकराविरुद्ध शारीरिक शोषण आणि धमकी दिल्याप्रकरणी गु्न्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाणे गाठले होते.
राम द्वार भागात राहणाऱ्या 32 वर्षीय श्वेता बन्सलवर संजय नगर भागात राहणाऱ्या 34 वर्षीय ब्युटीशियनने अॅसिड हल्ला केला. या हल्ल्यात श्वेता गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यात वाचवण्याच्या प्रयत्नात महिलेचा पती अमित बन्सल हा देखील जखमी झाला आहे. अमितने ब्युटीशियनवर 20 लाख रुपयांसाठी ब्लॅकमेल केल्याचा आरोपही केला आहे.
आरोपी तरुणी विवाहित प्रियकराच्या घराजवळच ब्युटीपार्लर चालवायची. अमित बन्सलची या तरुणीची मैत्री होती. दोघेही पाच वर्षे एकत्र होते. लग्नाच्या नावाखाली तो सतत तिच्यावर शारीरिक अत्याचार करत होता, असा आरोप तरुणीने केला आहे. गुरुवारीही तरुणी त्याला भेटायला आली होती. तिने अमितला फोन केला तेव्हा अमितची पत्नी श्वेता घराबाहेर आली. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. तरुणीने संतापून अमित बन्सलवर फेकण्यासाठी आणलेले अॅसिड त्याच्या पत्नीवर फेकले. हे पाहून अमितने पत्नीला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघेही भाजले. या हल्ल्यानंतर तरुणीने तेथून पळ काढला.
"ही मुलगी गेल्या दोन वर्षांपासून मला त्रास देत होती. मला खोट्या आरोपात अडकवण्याची धमकी देत 20 लाख रुपयांची मागणी करत होती. जेव्हा मला ब्लॅकमेल केले आणि मी पोलिसांकडे जाणार असल्याचे सांगितले तेव्हा तिने माझ्या पत्नीवर अॅसिड हल्ला केला. पत्नीला वाचवताना मीही भाजलो," असा दावा अमित बन्सलने केला आहे.