विकास भदाणे, जळगाव : मध्य रेल्वे मार्गावरून लवकरच मुंबई ते दिल्ली अशी 'राजधानी एक्स्प्रेस' धावणार असून नुकतीच मुंबई ते इगतपुरीदरम्यान राजधानी एक्स्प्रेसची यशस्वीरित्या चाचणी घेण्यात आली. या एक्स्प्रेसच्या मार्गातील कसारा घाटाचा अवघड पाडाव पार करण्यासाठी अंतिम चाचणीही १४ जानेवारीला घेतली जाणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यावर जानेवारी अखेरपर्यंत राजधानी एक्स्प्रेस सुरू होण्याची शक्यता आहे. या एक्स्प्रेसमुळे वेळेची बचत होणार असल्याने जळगावकरांची दिल्लीवारी सुकर होण्याची चिन्हे आहेत.
जळगावहून दिल्लीला जाण्यासाठी एखादी सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरू करण्यासंदर्भात प्रवासी संघटनेतर्फे पाठपुरावा सुरू होता. आता त्याला यश आल्याचे मानले जाते आहे. मुंबई ते दिल्लीदरम्यान मध्य रेल्वे मार्गावरून राजधानी एक्स्प्रेस सुरू करावी, यासाठी महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातील खासदारमंडळी आग्रही होती. विविध जिल्ह्यातील प्रवासी संघटनांतर्फे देखील रेल्वे प्रशासनाकडे याबाबत पाठपुरावा सुरू होता. त्याची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वे मार्गावरून मुंबई ते दिल्ली अशी राजधानी एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला.
सध्या संपूर्ण देशभरातून २३ राजधानी एक्स्प्रेस धावतात. त्यापैकी मुंबईहून २ एक्स्प्रेस धावतात. तसेच, मुंबई ते दिल्लीदरम्यान ‘ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेस’ही धावते. परंतु, या तिन्ही एक्स्प्रेस पश्चिम रेल्वे मार्गावरून गुजरातमार्गे धावत असल्याने मध्य रेल्वे मार्गावरील जनतेला त्याचा फायदा होत नव्हता. आता मात्र मध्य रेल्वे मार्गावरून स्वतंत्र राजधानी एक्स्प्रेस धावणार असल्याने त्याचा लाभ उत्तर महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातील जनतेला होणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावरून धावणारी राजधानी एक्स्प्रेस ही मुंबई येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटेल. तिला कल्याण, नाशिक, जळगाव, भुसावळ, खंडवा, भोपाळ, झाशी, आग्रा आणि हजरत निजामुद्दीन (दिल्ली) असे थांबे असण्याची शक्यता आहे. या एक्स्प्रेसची वेळ, वार आणि थांबे याबाबतचे वेळापत्रक अद्याप निश्चित झालेले नाही. जळगावसह शेजारील औरंगाबाद, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील व्यापारी, नोकरदारवर्गाला राजधानी एक्स्प्रेसचा लाभ होणार आहे.
जळगाववरून दिल्लीला जाण्यासाठी ज्या एक्स्प्रेस आहेत त्यांना साधारणपणे २८ ते २२ तास लागतात. परंतु, राजधानी एक्स्प्रेसमुळे या वेळेत तब्बल ६ ते ८ तासांची बचत होणार असून जळगावहून दिल्लीला जाण्यासाठी फक्त १० ते १२ तास लागतील असा अंदाज आहे. त्यामुळे प्रवासीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. तातडीने ही रेल्वे एक्स्प्रेस सुरू करावी अशी मागणी आता प्रवासी संघटनांकडून केली जाते आहे.