उत्तर प्रदेशात एक आरोपीने थेट जेलमधून सोशल मीडियावर लाईव्ह केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा आरोपी हत्येच्या गुन्ह्याची शिक्षा भोगत आहे. सोशल मीडियावर आपल्या समर्थकांशी संवाद साधताना त्याने सध्या आपण स्वर्गात मजा करत असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान हत्येच्या आरोपीने थेट जेलमधून लाईव्ह केल्याने कारागृह प्रशासनाच्या त्रुटी समोर आल्या आहेत. यानंतर प्रशासनाची झोप उडाली असून पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरु केली आहे. आरोपी सध्या उत्तर प्रदेशच्या बरेली सेंट्रल जेलमध्ये आहे.
पोलिसांनी या प्रकरणावर पीटीआयशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली आहे. जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे. उपमहानिरीक्षक (तुरुंग) कुंतल किशोर यांनी पीटीआयला आपण हा व्हिडिओ पाहिला असल्याचं सांगितलं आहे. "याप्रकरणी चौकशी सुरु आहे. तपासानंतर जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल," असं ते म्हणाले आहेत.
आसिफ असं या आरोपीचं नाव आहे. त्याने सोशल मीडियावर 2 मिनिटांचं लाईव्ह केलं आहे. यामध्ये त्याने आपण लवकरच तुरुंगातून बाहेर येऊ असा विश्वास व्यक्त केला आहे. "मी सध्या स्वर्गात असून, आनंद लुटत आहे. मी लवकरच बाहेर येईन," असं तो या लाईव्ह सेशनमध्ये सांगत आहे.
आसिफ हत्येचा आरोपी आहे. 2 डिसेंबर 2019 रोजी त्याने दिल्लीतील शाहजहांपूर येथील सदर बाजार पोलीस स्टेशन परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाचा (PWD) कंत्राटदार राकेश यादव (34) याला गोळ्या घालून ठार मारल्याचा आरोप आहे. आसिफसह राहुल चौधरी याच्यावरही राकेश यादवच्या हत्येचा आरोप आहे. सध्या आसिफ आणि राहुल हे दोन्ही आरोपी बरेली सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत.
राकेश यादवच्या भावाने हा व्हिडीओ पाहिल्यानंतर जिल्हा दंडाधिकारी उमेश प्रताप सिंग यांची भेट घेतली. यावेळी त्याने त्यांना हा व्हिडीओ दाखवला आणि तक्रार दाखल केली. तक्रारीत त्याने आसिफला जेलमध्ये विशेष सुविधा मिळत असल्याचा आरोप केला. तसंच आपल्या भावाची हत्या करण्यासाठी आसिफ आणि राहुल चौधरीला मेरठ येथून सुपारी देण्यात आली होती असाही आरोप केला.