मुंबई : असं म्हणतात की कोणाचं नशीब कधी खुलेल सांगता येत नाही. तसंच काही घडलं आहे एका भाजी विकणाऱ्या महिलेसोबत. आपल्या आईसोबत ती तिरुपतीच्या दक्षिण भागात भाजी विकायची आणि बघता बघता ती करोडपती झाली. 45 वर्षाची ही महिला 17 कंपन्यांची मालकीण झाली आणि मग कंपनीची वर्षाची उलाढाल 1000 कोटींच्या घरात पोहोचली.
दोन लाख पेक्षा अधिक गुंतवणूकदारांना सोबत घेऊन नोहेरा शेख हिने महिलांसाठी एक स्कीम सुरु केली. बघता-बघता नोहेरा शेख करोडपती बनली. त्यानंतर बिझनेस मॅनेजमेंटमध्ये या महिलेने डिग्री देखील घेतली आणि नंतर मुलीसांठी एक मदरसा देखील सुरु केलं. एवढंच नाही तर कर्नाटकच्या निवडणुकीत या महिलेने एक राजकीय पक्ष देखील बनवला. पण नोहेरा शेख जेवढ्या लवकर यशस्वी होत गेली तेवढ्याच लवकर ती खाली देखील आली. पोंजी स्कीमच्या माध्यमातून सात वर्ष पैसा जमा केल्यानंतर गुंतवणूकदारांनी नोहेरावर फसवणुकीचा आरोप केला.
पोंजी स्कीममध्ये 36 ते 42 टक्के रिटर्नचं आश्वासन देत नोहेराच्या कंपनीने महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमधून अनेक गुंतवणूकदार जमा केले. यानंतर या स्कीममध्ये गडबडीच्या बातम्या येऊ लागल्या आणि मग हा एक घोटाळा म्हणून समोर आला. मे 2018 पर्यंत नोहेरा शेखने फंड्समध्ये हेराफेरी केल्या. त्यानंतर त्यांच्यावर पोलिसात तक्रारी दाखल होऊ लागल्या. नोहेरा शेखवर आज 500 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
मुंबई पोलिसांनी नोहेरा शेखला अटक करुन चोकशीनंतर हैदराबाद पोलिसांकडे सोपवलं. नोहेराला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 25 ऑक्टोबरला अटक केली होती. या स्कीममध्ये गुंतवणूक करणारे अधिक जण हे मुस्लीम समुदायाचे असल्याचं देखील समोर आलं आहे.