पाकिस्तानला जाण्याआधी सिद्धूंना सुषमा स्वराज यांचा फोन आला

नवजोत सिंग सिद्धू यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. 

Updated: Aug 21, 2018, 05:44 PM IST
पाकिस्तानला जाण्याआधी सिद्धूंना सुषमा स्वराज यांचा फोन आला title=

नवी दिल्ली : भारताचे माजी क्रिकेटपटू, पंजाब सरकारमधले मंत्री आणि काँग्रेस नेते नवजोतसिंग सिद्धू पाकिस्तानला गेल्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. या टीकेवर सिद्धूंनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी फोन करून तुम्हाला पाकिस्तानला जायची परवानगी दिल्याचं सांगितल्याचं सिद्धू म्हणाले. तसंच माझ्यावर कारण नसताना टीका केली जात असल्याचं सिद्धू म्हणाले.

मला पाकिस्तानमधून १० वेळा बोलावणं आलं. यानंतर मी भारत सरकारकडे परवानगी मागितली. सुरुवातीला मला परवानगी मिळाली नाही त्यामुळे मी वाट बघत होतो. याचवेळी पाकिस्तान सरकारनं मला वीजा दिला. यानंतर दोन दिवसांनी सुषमा स्वराज यांनी मला फोन केला आणि पाकिस्तानला जायची परवानगी दिल्याचं सांगितलं, अशी प्रतिक्रिया सिद्धूंनी दिली आहे.

दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या टीकेवरही सिद्धूंनी भाष्य केलं आहे. काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वत:चं मत मांडण्याचा अधिकार आहे, असं सिद्धू म्हणाले.

लष्कर प्रमुखाची गळाभेट

सिद्धूंनी पाकिस्तान सेनेचे प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांची गळाभेट घेतली होती. यावरूनही भाजपनं सिद्धूंवर आणि काँग्रेसवर निशाणा साधला. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही सिद्धूंच्या या गळाभेटीवर नाराजी व्यक्त केली होती. एकीकडे भारताचे जवान सीमेवर शहीद होत असताना पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाची गळाभेट घेणं चुकीचं असल्याचं कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले होते.

इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला सिद्धूंना पाकव्याप्त काश्मीरचे राष्ट्रपती मसूद खान यांच्या बाजूला बसवण्यात आलं. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे आणि तिथल्या राष्ट्रपती पदाला किंवा पाकिस्तानकडून देण्यात येणाऱ्या कोणत्याही पदाचा भारत स्वीकार करत नाही.

इम्रान खानचा सिद्धूंना पाठिंबा 

तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सिद्धूंच्या मदतीला धावले आहेत. शपथविधील्या आल्यामुळे मी सिद्धूंचे आभार मानतो. सिद्धू पाकिस्तानमध्ये शांतीदूत म्हणून आले होते. पाकिस्तानमध्ये त्यांना भरपूर प्रेम आणि स्नेह मिळालं. भारतात जे लोक सिद्धूवर निशाणा साधत आहेत ते भारतीय उपखंडातल्या शांतीच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण करत आहेत. शांततेशिवाय आपण प्रगती करू शतक नाही, असं इम्रान खान म्हणाले आहेत. 

भारत आणि पाकिस्ताननं काश्मीरबरोबरच इतर मुद्द्यांवरही चर्चा करायला पाहिजे. भारतीय उपखंडातल्या नागरिकांची गरिबी हटवण्यासाठी आणि त्यांचं आयुष्य चांगलं करण्यासाठी चर्चा हाच मार्ग आहे. चर्चा करून मतभेद सोडवून व्यापार सुरु करावा, अशी भावना इम्रान खान यांनी व्यक्त केली.