नवी दिल्ली : संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना भाजपविरोधात आक्रमक झालेली पहायला मिळाली. ओल्या दुष्काळासाठी केंद्रानं मदत न जाहीर केल्यामुळे शिवसेनेच्या खासदारांनी सभात्याग करत कामकाजावर बहिष्कार घातला. तर दुसरीकडे भाजपविरोधात आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या खासदारांनी संसद भवन प्रांगणातल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जोरदार आंदोलन केलं.
ओल्या दुष्काळासंदर्भात करण्यात आलेली मदत तुटपुंजी असल्याचा आरोप करत शिवसेना खासदारांनी आंदोलन केलं. सोबतच खासदारांनी लोकसभेत देखील वेलमध्ये उतरून गोंधळ घालत घोषणाबाजी केली.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ओला दुष्काळासंदर्भात नंतर ऐकून घेणार अशी प्रतिक्रिया दिली मात्र तरी देखील शिवसेनेची घोषणाबाजी सुरूच होती. मात्र शिवसेनेच्या या पवित्र्यावर खासदार नवनीत राणा यांनी जोरदार टीका केलीय.