Neha Murder Case Update: कर्नाटकच्या हुबळी जिल्ह्यात एका कॉलेज परिसरात काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. आरोपीचे नाव फैयाज असून त्याचे वय अवघे 23 आहे. नेहाच्या हत्येनंतर आरोपीच्या वडिलांनी तिच्या घरच्यांची हात जोडत माफी मागितली आहे. तसंच, मुलाला कठोरात कठोर शिक्षा देण्याचीही मागणी केली आहे. आरोपी फैयाजचे वडिल बाबा साहेब सुबानी हे शिक्षक आहेत. पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
बाबा साहेब सुबानी यांनी म्हटलं आहे की, गुरुवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मला या घटनेबाबत माहिती झाले. त्याला (आरोपीला) अशी शिक्षा द्या की भविष्यात कोणी असे कृत्य करण्याचा विचारही करणार नाही. मी हात जोडून नेहाच्या कुटुंबातील सदस्यांची माफी मागतो. ती माझ्यासाठीही मुलीसारखीच होती. फैयाजच्या या कृत्याने त्याच्या वडिलांना मोठा धक्का बसला आहे.
सुबानी यांनी पुढे म्हटलं आहे की, मी आणि माझी पत्नी आम्ही गेल्या सहा वर्षांपासून वेगळे राहतोय. फैयाज त्याच्या आईसोबत राहतो. त्याला जेव्हा पैशांची गरज असायची तेव्हाच तो फक्त त्यांना फोन करायचा. त्यांचे शेवटचे बोलणे आठ महिन्यांपूर्वी झाले होते. त्यांनी पुढे म्हटलं आहे की, जवळपास आठ महिन्यांपूर्वी त्यांना नेहाच्या कुटुंबीयांचा फोन आला होता. त्यांनी म्हटलं होतं की तुमचा मुलगा नेहाला त्रास देतोय. आपल्या मुलाची चुक कबुल करुन त्यांनी म्हटलं होतं की फैयाज आणि नेहा एकमेकांवर प्रेम करत होते.
त्यांनी म्हटलं आहे की, फैयाजने मला म्हटलं होतं की त्याला नेहासोबत लग्न करायचे आहे. तेव्हा मी त्याला हात जोडून विरोध केला होता. आपल्या मुलाने केलेल्या या कृत्यावर बोलताना ते म्हणाले की, कोणत्याच महिलेसोबत असा अत्याचार होऊ नये. मी कर्नाटकातील लोकांना मला माफ करण्याची विनंती करतोय. माझा मुलगा चुकला आहे. कायदा त्याला शिक्षा देईलच आणि मी ते स्वीकार करेन. माझ्या मुलामुळं या शहरावर कलंक लागला. मुनावल्लीचे लोक कृपया मला माफ करा, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, नेहाच्या कुटुंबीयांनी आरोपीना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. जेणेकरुन त्यांच्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल. तर, फैयाज आणि नेहा यांच्यात प्रेमसंबंध होते हा दावाही त्यांनी फेटाळला आहे. नेहाने त्याला नकार दिल्याने त्याने तिची हत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
हुबळी-धारवाड नगरपरिषदेचे काँग्रेस नगरसेवक निरंजन हिरेमथ यांची मुलगी नेहा हिरेमथ (23) हिची 18 एप्रिल रोजी कॉलेज परिसरात कथितपणे चाकू भोसकून हत्या केली होती. ती MCA च्या पहिल्या वर्गात शिकत होती. तर, आरोपी फैयाज तिचाच वर्गमित्र होता. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहावर कित्येक वार करण्यात आले आहेत. दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ती त्याला टाळत होती. पोलिसांनी म्हटलं आहे की, आरोपीला लगेचच अटक करण्यात आली.