VIDEO : योगाचा नेमका धर्म कोणता?, ॐ उच्चाराला काँग्रेसचा आक्षेप

आंतरराष्ट्रीय योग दिनी नव्या वादाला तोंड फुटलंय

Updated: Jun 21, 2021, 09:54 PM IST
VIDEO : योगाचा नेमका धर्म कोणता?, ॐ उच्चाराला काँग्रेसचा आक्षेप

नवी दिल्ली : भारतासह जगभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. पण आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या मुहूर्तावर काँग्रेस नेता अभिषेक मनु सिंघवी (Abhishek Manu Singhvi) यांच्या एका ट्विटने (Tweet) नव्या वादाला तोंड फोडलंय. ॐ च्या उच्चारामुळं ना योग जास्त शक्तिशाली होणार, ना अल्लाह म्हटल्यामुळं योगशक्ती कमी होणार, असं संघवी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

संघवी यांच्या ट्विटनंतर वाद
संघवी यांच्या या वक्तव्यानंतर बाबा रामदेव आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. देव त्यांना सद्बुद्धी देवो असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. तर काँग्रेस नेते अशा प्रसंगी नेहमीच राजकारण करतात आणि वादग्रस्त वक्तव्य करतात असं शिवराज सिंह यांनी म्हटलंय.
कोरोनाविरुद्धच्या लढाईत योग आणि लसीकरण हे दोन्ही संजीवनी ठरत आहेत. संपूर्ण जगात योगामुळे भारताची नवी ओळख तयार झाल्याचंही शिवराज सिंह यांनी म्हटलंय.

भाजप नेत्यांची टीका
योगाला धार्मिक रंग देण्यावरून काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक वादावादी सुरू झाली. ॐ उच्चारामुळे आपली शक्ती वाढते, पण काँग्रेसची शक्ती घटत असेल, कारण यामुळे त्यांची वोट बँक कमी होते, अशी टीका भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी केली आहे. गेल्या सात वर्षात एकही दंगल झाली नाही, 370 कलम हटवल्यावरही देशात उद्रेक झाला नाही, किंवा राम मंदिर निर्माण होत असतानाही शांतता आहे, यामुळे त्यांची अडचण झाली आहे, असं प्रवेश वर्मा यांनी म्हटलंय. 

तर भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी अशा छोट्या नेत्यांच्या ट्विटने योगाचं महत्त्व कमी होणार नसल्याचं म्हटलं आहे. काही असे प्रसंग असतात ज्यावर राजकीय माध्यमातून संकुचित मनोवृत्तीचं प्रदर्शन करणं उचित नसतं, असं विजयवर्गीय यांनी म्हटलं आहे.

एकीकडं जगभरात योग साधनेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो... आणि त्याच दिवशी योगाला धार्मिक रंग देण्याचे उपद्व्याप राजकारण्यांनी केला आहे.