नवी दिल्ली : वाढत्या प्रदूषण पातळीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि आसपासच्या परिसरात ऑड-इव्हन फॉर्म्युला लागू करण्यास राष्ट्रीय हरित लवादाने सशर्त मंजुरी दिलीय. सीएनजी वाहनं वगळून सर्व वाहनांवर हा फॉर्म्युला लागू करण्यात यावा, असं राष्ट्रीय हरित लवादाने दिल्ली सरकारला सांगितलंय.
दुचाकीस्वारांना या फॉर्म्युल्यामधून कोणतीही सूट मिळणार नाही. केवळ अग्निशमन गाड्या, अॅम्ब्युलन्स अशा अत्यावश्यक सेवांना या फॉर्म्युल्यातून वगळण्यात आलंय. महिला वाहनचालक आणि सरकारी कर्मचारी असणाऱ्या चालकांनाही या फॉर्म्युलात सूट देण्यात आलेली नाही.
सोमवारपासून पाच दिवसांसाठी म्हणजेच 17 नोव्हेंबरपर्यंत हा फ़ॉर्म्युला लागू राहील. याआधी सुनावणी दरम्यान राष्ट्रीय हरित लवादाने दिल्ली सरकारला चांगलंच फटकारलं होतं. दिल्लीतलं प्रदूषण वाढलं असतानाही 'ऑड इव्हन' का लागू केला नाही, असा सवाल लवादानं केजरीवाल सरकारला विचारला होता.
कोणत्या आधारावर हा फॉर्म्युला लागू करावा किंवा लागू करु नये, याचा निर्णय घेण्यात आला असंही, लवादाने विचारलं होतं. आदेश दिल्यावरच सरकार कारवाई करणार का असा सवालही राष्ट्रीय हरित लवादाने उपस्थित केला होता.