नव्या संसद भवनाचा वाद सुप्रीम कोर्टात... फडणवीस म्हणतात 'विरोधक सत्तेचे सौदागर'

नवीन संसद भवन इमारतीच्या उदघाटन वादावरून सुप्रीम कोर्टात याचिका करण्यात आली आहे. राष्ट्रपतींनीच संसदेचं उदघाटन करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. तर संसद भवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार म्हणजे लोकशाही नाकारणं असल्याची टीका फडणवीसांनी केलीय

राजीव कासले | Updated: May 25, 2023, 02:08 PM IST
नव्या संसद भवनाचा वाद सुप्रीम कोर्टात... फडणवीस म्हणतात 'विरोधक सत्तेचे सौदागर' title=

New Parliament House : नवीन संसद भवनाच्या इमारतीचं उद्घाटन येत्या 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. पण या उद्घाटन कार्यक्रमावरुन नवा वाद उभा राहिला आहे. नवीन संसद  भवन (New Parliament Building) उदघाटनाचा वाद सुप्रीम कोर्टात (Supreme Court) पोहोचलाय. राष्ट्रपतींनीच (President of India) संसदेचं उदघाटन करण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलीय. वकील सी.आर.जयासुकीन यांनी ही याचिका केली असून, राष्ट्रपतींनी उदघाटन करण्याचे निर्देश लोकसभा सचिवालयाने द्यावेत अशी मागणी केलीय. राष्ट्रपतींना संसद बोलवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे उदघाटनाचा अधिकारही राष्ट्रपतींचाच असल्याचं याचिकेत म्हटलंय.

पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल
विरोधकांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याने पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) ऑस्ट्रेलियातील कार्यक्रमाचं उदाहरण देत टोला लगावला आहे. ऑस्ट्रेलियातील कार्यक्रमात ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान, माजी पंतप्रधान आणि विरोधक एकत्र आले होते. तिथे लोकशाहीचं दर्शन घडल्याचं म्हणत संसदेच्या कार्यक्रमात बहिष्कार घालणाऱ्या विरोधकांना त्यांनी टोला लगावलाय.

'विरोधक सत्तेचे सौदागर'
नवीन संसद भवनाच्या उदघाटन वादावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीही विरोधकांवर निशाणआ साधलाय. विरोधक हे सत्तेचे सौदागर आहेत, मोदींशी मुकाबला करू शकत नसल्याने सगळे एक झालेयत. त्यांचं स्वप्न पूर्ण होणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तसंच संसद भवन उदघाटनावर बहिष्कार टाकणं म्हणजे लोकशाही नाकारणं असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांनी केलेल्या उद्घाटनांची लिस्ट वाचून दाखवली.

संजय राऊत यांची टीका
नव्या संसदेच्या उदघाटन वादावरून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय. नव्या संसदेचं उद्घाटन राष्ट्रपतींनीच करावं, संसदेच्या उदघाटनाचा राष्ट्रपतींचा अधिकार असून, मोदींनी राष्ट्रपतींना निमंत्रण द्यावं अशी मागणी राऊतांनी केलीय. आम्ही विरोधक नाही, आम्ही देशभक्त आहोत. मात्र, राष्ट्रपतींना निमंत्रण नसल्याने आमचा बहिष्कार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय.

दुसरीकडे उदघाटनाच्या वादावर प्रकाश आंबेडकरांनी मोठं विधान केलंय. भाजपची सत्ता गेली तर पुन्हा संसदेचं उदघाटन होईल आणि मोदींच्या नावाचा दगड काढून तिथे मुर्मूंचं नाव लावलं जाईल असं आंबेडकरांनी म्हटलंय..

कसं आहे नवं संसद भवन
लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्यांनी 5 ऑगस्ट 2019 रोजी नव्या संसद भवानासाठी केंद्र सरकारकडे आग्रह केला होता. त्यानंतर 10 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचं भूमिपूजन करण्यात आलं. चार मजल्यांच्या या इमारतीत 1224 खासदारांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.