निर्भया प्रकरणातील आरोपींना लवकरच फाशी?

बिहारच्या बक्सर कारागृहाला या अठवड्याच्या शेवटपर्यंत १० फाशीचे दोरखंड तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.

Updated: Dec 9, 2019, 05:01 PM IST
निर्भया प्रकरणातील आरोपींना लवकरच फाशी? title=

नवी दिल्ली : हैदराबाद सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. त्यानंतर आता निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी अशी मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहे. आता ही मागणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. कारण बिहारच्या बक्सर कारागृहाला या अठवड्याच्या शेवटपर्यंत १० फाशीचे दोरखंड तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.

हे आदेश पाहता असा अंदाज वर्तवण्यात येत आहे की, निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना फशी होवू शकते. फक्त बिहारच्या बक्सर कारागृहाकडेच फाशीचा दोरखंड बनवण्याचा अधिकार आहे. गेल्या अठवड्यात हे दोरखंड बनवण्याचे निर्देश कारागृह प्रशासनाला देण्यात आले आहेत.

दरम्यान, बक्सर कारागृहाचे अधिक्षक विजय कुमार यांच्या सांगण्यानुसार, 'गेल्या आठवड्यात कारागृह संचालनालयकडून १४ डिसेंबर पर्यंत १० फाशीचे दोरखंड तयार करण्यासाठी निर्देश मिळाले होते. हे दोरखंड कोठे वापरण्यात येतील याची कल्पना आम्हाला नाही.'  

ते पुढे म्हणाले, 'बऱ्याच काळापासुन बक्सर कारागृहात फोशीचे दोरखंड तयार करण्यात येतात. एका दोरखंडासाठी ७ हजार २०० कच्च्या धाग्यांचा वापर करण्यात येतो.' एक दोरखंड तयार करण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

काय आहे निर्भया प्रकरण?

दिल्लीत चालत्या बसमध्ये निर्भयावर सामूहिक बलात्कार झाला. त्यानंतर उपचारांसाठी दिल्लीतील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. परंतू उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात एकूण सहा जण दोषी होते. ज्या पैकी एकजण अल्पवयीन होता.

दोषी राम सिंह याने तिहार तुरुंगामध्ये आत्महत्या केली. यानंतर चार दोषींना दिल्ली उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. या निर्णयाविरोधात दोषींच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्यांची पुनर्विचार याचिका न्यायलयाने फेटाळून लावली.