नवी दिल्ली : दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या चौघाही गुन्हेगारांना पहाटे साडे पाच वाजता फाशी देण्याची तयारी तिहार जेल प्रशासनानं केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीमुसार, मृत्यू समोर दिसत असल्यानं चारही गुन्हेगार अस्वस्थ आहेत. मृत्युच्या भीतीनं क्रुरकर्मा आपआपल्या कोठडीत रडत आहेत. जेल प्रशासनाकडून चारही दोषींवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे.
चारही दोषींवर सातत्यानं लक्ष ठेवावं, एक क्षण देखील लक्ष विचलित होऊ देऊ नका, असे निर्देशच सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिले आहेत. कारण आत्महत्येचं नाटक करून फाशी टाळण्याची चाल चौघेजण खेळू शकतात. त्यामुळे पहाटे फासावर लटकवण्यापर्यंत त्यांच्यावर सतत लक्ष ठेवण्यात येणार आहे.
चौघांना फाशी देण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी तिहार जेलच्या महासंचालकांनी संध्याकाळी उच्चस्तरिय बैठक घेतली.
चारही दोषींना पहाटे फाशी दिल्यानंतर चौघांचं शव तिहार जेल प्रशासनाकडून दीनदयाल हॉस्पिटलमध्ये नेण्यात येईल. पोस्टमार्टम म्यॅन्युअलनुसार साधारण सकाळी ८ वाजता शवविच्छेदन प्रक्रिया सुरु होईल.
शवविच्छेदनानंतर चौघांचे शव ताब्यात घेणार की नाही याबाबत चौघांच्या कुटुंबीयांनी अजूनही काही सांगितलेलं नाही. जर कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतले नाही तर पोलीस प्रशासन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करेल. जेल मॅन्युअलनुसार तशीच प्रक्रिया केली जाईल.
चारही आरोपींनी अजून त्यांची शेवटची इच्छा सांगितलेली नाही. पण फाशी दिल्यानंतर या चौघांनी जेलमध्ये श्रम करून जो पैसा कमवला आहे, ती रक्कम कैदी अकाऊंटमधून त्यांच्या कुटुंबीयांना दिली जाईल.