नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमधील नोएडा (Noida) येथे अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर (Supertech Twin Towers) अवघ्या 12 सेकंदात ही इमारत पत्त्यासारखी कोसळली. जमीनदोस्त झालेली देशातील ही पहिली उंच इमारत होती. कुतुबमिनारपेक्षा उंच असणारी ही इमारत तीन हजार 700 किलो वजनाच्या स्फोटकांच्या माध्यमातून पाडण्यात आली. एडिफाय इंजिनीअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचे काम देण्यात आले होते. ही इमारत पाडण्यासाठी 46 जणांची टीम काम करत होती.
ट्विन टॉवरचा खर्च
सुपरटेक ट्विन टॉवर बांधण्यासाठी 933 रुपये प्रति चौरस फूट (पर स्क्वेअर फीट) एवढा खर्च झाला. साडेसात लाख चौरस फुटांच्या बांधकामासाठी सुमारे 70 कोटी रुपयांचा खर्च झाला. त्यातच ट्विन टॉवर पाडण्यासाठी पाडण्यासाठी 237 रुपये प्रति चौरस फूट (पर स्क्वेअर फीट) म्हणजे सुमारे 20 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.
3BHK 1.13 कोटींचा
सुपरटेक एमराल्ड कोर्ट प्रोजेक्टमधील एका थ्री बीएचके फ्लॅटची किंमत 1.13 कोटी रुपये होती. ट्विन टॉवरमध्ये 915 निवासी फ्लॅट होते. यापैकी 633 फ्लॅटचे बुकिंग झाले होती. कंपनीला 180 कोटी रुपये मिळाले होते. तर व्यवहारांची उर्वरित रक्कम यायची होती. ट्विन टॉवरचे सर्व फ्लॅट विकून कंपनी 1200 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त कमाई करेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. आता कंपनी ज्यांच्याकडून पैसे घेतले त्यांना 12 टक्के व्याजदराने घेतलेले पैसे परत करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परतावा दिला जाणार आहे.
ढिगारा 3 महिन्यांत हटविणार
ट्विन टॉवरचा ढिगारा हटविण्यासाठी 3 महिने लागणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या कालावधीत तीन हजार किंवा त्यापेक्षा जास्त ट्रक भरून ढिगारा हटविला जाईल.