नवी दिल्ली : नोएडाच्या सेक्टर-93-A मध्ये भ्रष्टाचाराच्या पायावर बांधलेली 32 मजली सुपरटेक ट्विन टॉवर (Supertech Twin Tower) आज जमीनदोस्त होणार आहे. नोएडाचे या ट्विन टॉवर्स स्फोटकांनी पाडण्यासाठी काऊंटडाऊन सुरू झाले आहे. दुपारी 2.30 वाजता हा टॉवर पाडण्यात येणार आहे. ही इमारत कोसळल्यानंतर शेकडो मीटरपर्यंत धूळ पसरेल. परिणामी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना या धुळीमुळे काही आजार उद्भवू शकता.
आजूबाजूच्या परिसरात धुळीचे ढग पसरतील
हे ट्विन टॉवर पाडण्यासाठी 46 जणांची टीम काम करत आहे. ही टीम दररोज सुमारे 12 तास स्फोटकं म्हणजेच 3700 किलो स्फोटके लावण्याचं काम करत आहे. स्फोटकांच्या मदतीनं अवघ्या काही क्षणात हे दोन टॉवर जमीनदोस्त होतील. विशेष म्हणजे, 32 मजली टॉवर्स पाडल्यानंतर 30 मीटर उंचीपर्यंत याचा ढिगारा तयार होईल. हे टॉवर्स पाडल्यानंतर परिसरात 9 सेकंदात शेकडो मीटरपर्यंत धूळ पसरेल. धुळीचे हे ढग 3 किमीच्या परिसरात पसरतील. त्यामुळे धूळ हळूहळू खाली येईल. मात्र आकाशातील धुके दूर होण्यास किमान ३ तास लागतील, असे सांगण्यात येत आहे. मात्र यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिओ फायबर शीट्स बसवण्यात आल्या आहेत. याशिवाय झाडांच्या सुरक्षेसाठी त्यांना काळ्या पांढऱ्या हिरव्या चादरीनं झाकण्यात आलं आहे. जमीनदोस्त होणारी देशातील ही पहिली उंच इमारत असेल.
या गोष्टींची विशेष काळजी घ्या
ट्विन टॉवर पडल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी मास्क घालणे आवश्यक आहे. धुळीमुळे श्वास आणि दम्याच्या रुग्णांना विशेष त्रास होऊ शकतो. हृदयरोगींनीही सावध राहण्याची गरज आहे. डोळ्यांच्या सुरक्षेसाठी चष्मा लावा. पाणी वारंवार पीत राहा. जेणेकरून धूळ शरीरावर चिकटणार नाही. 3 दिवस या भागात न जाण्याचा प्रयत्न करा. ही इमारत कोसळल्यानंतर 35,000 घनमीटर मलबा बाहेर येईल. जो साफ करण्यासाठी किमान तीन महिने लागतील.
आजूबाजूची सोसायटी रिकामी करण्यात आली
आतापर्यंत 40 टक्के लोकांनी एमराल्ड सोसायटी ऑफ सुपरटेकमधून त्यांची घरे रिकामी केली आहेत. जवळच बांधलेल्या दोन सोसायट्यांमध्ये लोकांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच त्यांच्या खाण्यापिण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. एमराल्ड कोर्टातील रहिवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पार्श्वनाथ आणि सिल्व्हर सिटी सोसायटीमध्ये बांधण्यात आलेल्या क्लब हाऊस आणि गेस्ट हाऊस सोसायटीतील लोकांना 200 - 200 लोकांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
नोएडातील सेक्टर 93 मध्ये सुपरटेक बिल्डर्स या खासगी बांधकाम व्यवसायिकाने दोन 32 मजली इमारती बांधल्या आहेत. ॲपेक्स आणि सेयान असं या इमारतींचं नाव आहे. मात्र इमारती बांधताना भुखंडाच्या तसेच बांधकामाच्या नियमांना पायदळी तुडवण्यात आल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळेच या इमारती पाडण्याचा आदेश काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने दिला आहे.