रोहतक : हरियाणाच्या एका कोर्टानं बाबा रामदेव यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावलंय.
गेल्या वर्षी बाबा रामदेव यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आलीय. 'भारत माता की जय न बोलणाऱ्यांचे शीर धडापासून वेगळं करायला हवं' असं वादग्रस्त वक्तव्य बाबा रामदेव यांनी केलं होतं.
यापूर्वी कोर्टानं बाबा रामदेव यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट बजावलं होतं... परंतु, अनेकदा समन्स धाडल्यानंतरही बाबा रामदेव न्यायालयासमोर हजर झाले नाहीत.
तक्रारकर्ते वकील ओ पी चुग यांच्या याचिकेवर सुनावणी करताना अतिरिक्त मुख्य न्यायिक मॅजिस्टेट हरीश गोयल यांनी बाबा रामदेव यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावलंय.
आता, या प्रकरणाची सुनावणी ३ ऑगस्ट रोजी होणार आहे.