रामराजे शिंदे, झी २४ तास, नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दिल्लीतील तणावग्रस्त भागाचा दौरा केला. रात्री उशीरा दिल्लीच्या सीलमपूर भागात त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांशी परिस्थितीसंदर्भात चर्चा केली. दिल्लीच्या अधिकाऱ्यांसह जाफराबाद, करावल नगर, मुस्तफाबाद भागाची देखील पाहणी केली. एनएसए अजित डोवाल हे पंतप्रधान मोदी यांना याबाबतची माहिती देणार आहेत. दिल्लीत झालेल्या हिंसेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे.
तणावग्रस्त भागात कलम १४४ लागू करण्यात आलं असून दंगलखोरांना पाहताच गोळी मारण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत. तसंच दिल्ली-गाजियाबाद सीमा बंद करण्यात आल्या आहेत. जाफराबाद आणि मौजपूरमध्ये पोलिसांनी आंदोलकांना हटवलं आहे. दिल्लीतील तणावात आत्तापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५० जण जखमी झाले आहेत. दिल्लीतल्या परिस्थितीमुळे सीबीएसईची परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.
नागरिकत्व संशोधन कायदा (CAA)च्या विरोधात दिल्लीत आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाच्या दरम्यान दिल्लीत अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन होत आहे. दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी हिंसेच्या घटना पुढे येत आहे. देशाची राजधानी दिल्लीत सध्या तणावाचं वातावरण आहे. आतापर्यंत १७ लोकांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी आणि मंगळवारी उत्तर पूर्व दिल्लीतील मौजपूर-चांदबाग भागात परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. दोन गटांमध्ये दगडफेक आणि हाणामारी झाली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलिसांना आणि अतिरिक्त सुरक्षा दलाच्या जवानांचं पाचारण करण्यात आलं.
दिल्लीतील हिंसेच्या प्रकरणावर मध्यरात्री सुनावणी झाली. न्यायाधीश एस. मुरलीधर यांच्या घरी पर मंगळवारी झालेल्या सुनावणीत दिल्ली पोलिसांना मुस्तफाबादच्या रुग्णालयातील लोकांना एका सुरक्षित रस्त्याने रुग्णवाहिकेने सरकारी रुग्णालयांमध्ये दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. या प्रकरणी कोर्टाने अहवाल मागवला आहे.