पालकांनो लक्ष द्या! नर्सरीच्या 2 मुलींवर चालकाकडून बलात्कार; रक्ताने माखलेल्या कपड्यात पोहोचल्या घऱी

घरी सोडण्यासाठी जात असताना स्कूल व्हॅन चालकाने दोन मुलींवर वारंवार बलात्कार केला. इतकंच नाही तर आरोपीने आपल्या फोनमध्ये हा सगळा प्रकार रेकॉर्डही केला.   

शिवराज यादव | Updated: Nov 30, 2023, 11:16 AM IST
पालकांनो लक्ष द्या! नर्सरीच्या 2 मुलींवर चालकाकडून बलात्कार; रक्ताने माखलेल्या कपड्यात पोहोचल्या घऱी title=

सध्या अनेक पालक नोकरी करत असल्याने मुलांना शाळेत पाठवण्यासाठी स्कूल व्हॅन किंवा रिक्षा यांनाच प्राधान्य देतात. या बसेस, रिक्षा घऱाखाली येत असल्याने पालकांना सोयीस्कर पडतं आणि वेळही वाचतो. यानिमित्ताने पालक एकाप्रकारे आपलं मूल पूर्ण विश्वासाने त्या चालकाकडे सोपवत असतात. पण हा विश्वास किती आंधळा ठरु शकतो हे दाखवणारी आणि अशा पालकांना खडबडून जागं करणारी एक घटना समोर आली आहे. बिहारमध्ये स्कूल व्हॅन चालकाने नर्सरीत शिकणाऱ्या दोन मुलींवर बलात्कार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. इतकंच नाही तर आरोपी चालकाने हा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. 

बिहारच्या बेगुसराई जिल्ह्याच्या बिरपूर परिसरात ही घटना घडली आहे. स्कूल व्हॅन चालकाने येथे नर्सरीत शिकणाऱ्या दोन मुलींवर बलात्कार केला. आरोपीने मुलींना शाळेतून घरी नेत असताना रस्त्यात हे कृत्य केलं. मुलींच्या पालकांनी यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

पालकांनी तक्रारीत सांगितलं आहे, त्यानुसार, मुली घरी पोहोचल्या तेव्हा त्यांचे कपडे रक्ताने माखले होते. त्यांच्याकडे चौकशी केली असताना त्यांनी घडलेला सगळा प्रकार सांगितला. यानंतर पालकांनी तात्काळ घटनास्थळावरुन पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या चालकाला पकडलं. 

पालकांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत माहिती दिली आहे की, सिकंदर राय असं आरोपी चालकाचं नाव आहे. मुलींना शाळेतून घरी आणत असताना तो त्यांना एका निर्जनस्थळी घेऊन गेला आणि बलात्कार केला. आरोपीने यावेळी घटनेचा व्हिडीओही रेकॉर्ड केला. 

आरोपीने आरोप फेटाळले असून, आपला यात काही सहभाग नसल्याचा दावा केला आहे. दरम्यान पोलिसांनी तपास सुरु असल्याची माहिती दिली आहे. पण या घटनेनंतर परिसरात संतापाचं वातावरण आहे. 

पीडित मुली एका खासगी शाळेत शिकतात. पोलिसांनी सांगितलं आहे की, शाळेने कोणतीही योग्य पार्श्वभूमी किंवा माहिती न घेताच सिकंदर रायला कामावर ठेवलं होतं. आरोपी सिकंदर रायने आपण गेल्या 3 वर्षांपासून शाळेसाठी काम करत असल्याची माहिती दिली आहे. मुलींना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.