ट्रेन तिकीट बूक करतानाच मिळतो Insurance, फक्त 35 पैशांत 10 लाखांपर्यंत नुकसान भरपाई, कसं ते समजून घ्या

Train Ticket Insurance Cover : रेल्वे तिकिट बूक करताना आपण केवळ तिकिट कन्फर्म झालं की नाही हे पाहातो. पण तुम्हाला माहित आहे का रेल्वे तिकिट काढतानाच विमा काढण्याचा पर्याय दिला जातो.

राजीव कासले | Updated: Jun 3, 2023, 03:07 PM IST
ट्रेन तिकीट बूक करतानाच मिळतो Insurance, फक्त 35 पैशांत 10 लाखांपर्यंत नुकसान भरपाई, कसं ते समजून घ्या title=

Odisha Train Accident : ओडिशातल्या बालासोरमध्ये (Balasore) झालेल्या भीषण रेल्वे अपघाताने संपूर्ण देश हळहळला आहे. या अपघातात 261 जणांचा मृत्यू झाला (280 Passengers Dies) असून जवळपास 900 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात अनेक कुटुंब उद्धव्स्त झाली. हा अपघात इतका भीषण होता की तीन ट्रेन एकमेकांना धडकल्या. बहानगा बाजार स्टेशनवर (Bahanaga Railway Station) मालगाडी उभी होती. यावेळी हावडाकडून वेगाने आलेली कोरोमंडल एक्स्प्रेसने मालगाडीला जाऊन धडकली. कोरोमंडल एक्स्प्रेसचं इंजिन मालगाडीवर चढलं होतं. तर अनेक बोगी रेल्वे रुळावरुन खाली घसरल्या. त्याच दरम्यान हावडा-बंगळुरु एक्स्प्रेस कोरोमंडल एक्स्प्रेसला धडकली. त्यामुळे या अपघाताची व्याप्ती वाढली. 

प्रवाशांना मिळतो विमा
अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांच्या जीवाचा किंमत होऊ शकत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉरपॉरेशन म्हणजेच IRCTC तर्फे प्रत्येक प्रवाशाचा विमा (Insurance) केला जातो. या अंतर्गत 10 लाख रुपयांपर्यंत संरक्षण देण्याची तरतूद आहे.

तिकिट बूक करताना पर्याय
देशात लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी आजही लोकं रेल्वे प्रवासावर जास्त विश्वास ठेवतात. सुरक्षित आणि आरामदायी रेल्वे प्रवासाला प्रवाशांची पसंती मिळते. डिजिटायझेशनच्या युगात तिकीट काउंटरवर वेळ न घालवता घरबसल्या ऑनलाइन रेल्वे तिकीट बुक करता येतात. यामध्ये तुमची सीट निवडण्यापासून ते प्रवासादरम्यान तुम्हाला खाण्यापिण्याचा पर्याय दिला जातो. पण त्याचबरोबर प्रवाशांना विमा घेण्याचा पर्यायही मिळतो. यात रेल्वे प्रवासादरम्यान जीवित आणि मालमत्तेचं नुकसान झाल्यास मोबदला दिला जातो. 

सर्वात स्वस्त विमा
रेल्वेकडून दिला जाणारा विमा हा सर्वात स्वत: आहे. प्रवाशांना केवळ 35 पैशात शून्य प्रीमिअमवर 10 लाख रुपयांपर्यंतंच विमा संरक्षण दिलं जातं. हा पर्याय ऑप्शनमध्ये असतो. जेव्हा आपण आयआरसीटीसाच्या वेबसाईटवर रेल्वेचं तिकिट बूक करतो. त्यावेळी आपल्याला विम्याचा पर्याय दिसतो. हा पर्याय निवडल्यानंतर केवळ 35 पैशात आयआरसीटीकडून प्रवाशांना विमा संरक्षण दिलं जातं. पीएनआर अंतर्गत जितकी तिकिटं बूक केली जातात त्या सर्व प्रवाशांना विमा लागू होतो.

या परिस्थितीत मिळतो विमा
आयआरसीटीसीकडून दिला जाणारा हा विमा केवळ 35 पैशात प्रवाशांना मिळतो. या विमा संरक्षणामध्ये आंशिक अपंगत्व, कायमस्वरूपी अपंगत्व, दुखापत किंवा गंभीर दुखापतींमुळे रुग्णालयात दाखल करण्यासाठी वाहतूक खर्च आणि प्रवासादरम्यान मृत्यू यांचा समावेश होतो. हे वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागलं गेलं आहे.

जखमींना 2 लाख, मुत्यू झाल्यास 10 लाख
आयआरसीटीसीच्या या विमा संरक्षणात रेल्वे अपघातात प्रवासी जखमी झाल्यास त्याला रुग्णालयातील उपचारासाठी 2 लाख रुपयांचं संरक्षण दिलं जातं. अपघातात प्रवाशाला अपंगत्व आल्यास 7.5 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. तर दुर्दैवाने प्रवाशाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांचा निधी दिला जातो.