Omicron variant: दिलासादायक, ओमायक्रॉनचे ९९ टक्के रुग्ण सात दिवसात झाले बरे

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ओमायक्रॉन खूप वेगाने पसरतो, परंतु तो शरीरात जास्त काळ टिकत नाही  

Updated: Jan 4, 2022, 06:37 PM IST
Omicron variant: दिलासादायक, ओमायक्रॉनचे ९९ टक्के रुग्ण सात दिवसात झाले बरे  title=

Omicron variant: देशात कोरोना व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron variant) रुग्णांची संख्या 1900 च्या पुढे गेली आहे. नवीन व्हेरिएंटमुळे अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण (Coronavirus) झपाट्याने वाढू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. या परिस्थितीतही एक दिलासा अहवाल आला आहे. 

देशातील 99 टक्के ओमायक्रॉन रुग्ण एका आठवड्यात बरे होत आहेत. बाधितांमध्येही कोरोनाची लक्षणे अतिशय सौम्य दिसून आली आहेत. दिल्लीतील लोकनायक हॉस्पिटलमध्ये हा अभ्यास करण्यात आला आहे.

लोकनायक रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर सुरेश कुमार यांनी सांगितलं की, आठवडाभरात ओमायक्रॉन रुग्णांचा आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह येत आहे. आतापर्यंत रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांपैकी ९९ टक्के रुग्ण सात दिवसांत बरे होऊन घरी गेले आहेत. फक्त एक संक्रमित होता ज्याला 10 दिवस रुग्णालयात ठेवावं लागलं. या रुग्णाला टीबीचा त्रास होता. त्यामुळे त्याला रिकव्हर होण्यासाठी थोडा जास्त कालावधी लागला.

ओमायक्रॉनचा वेगाने प्रसार

ओमायक्रॉनचा प्रसार खूप वेगाने होतो, पण तो शरीरात जास्त काळ राहत नाही, असं आतापर्यंतच्या रुग्णांच्या अभ्यासावरुन लक्षात आल्याचं डॉ. सुरेश यांनी म्हटलं आहे. डेल्टाशी तुलना केल्यास, डेल्टाच्या संक्रमित लोकांना बरं होण्यासाठी 10 दिवस लागायचे. यातही असे अनेक रुग्ण आहेत ज्यांचे अहवाल महिनाभरानंतरही निगेटिव्ह आले नाहीत. पण ओमायक्रॉन संसर्ग झालेल्यांमध्ये आतापर्यंत गंभीर लक्षणं आढळलेली नाहीत. आतापर्यंत 100 हून अधिक रुग्ण रुग्णालयातून बरे झाले आहेत. या रुग्णांवर केलेल्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे.

रुग्णाला ऑक्सीजनची आवश्यकता भासली नाही
आतापर्यंत ओमिक्रॉनच्या एकाही रुग्णाला ऑक्सिजनची  (Oxygen) गरज लागलेली नाही, सर्व बाधितांमध्ये फ्लू सारखी लक्षणे होती, अशी माहिती डॉ. सुरेश यांनी दिली आहे.  या रुग्णांमध्ये सामान्य समस्या म्हणजे थकवा आणि घसा खवखवणे ही होती. तापही दोन-तीन दिवसांत उतरतो. डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉन खूपच सौम्य आहे.

डॉ. सुरेश यांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयात दाखल झालेल्या जवळपास सर्वच रुग्णांचं संपूर्ण लसीकरण झालं आहे.  कदाचित त्यामुळे बाधितांमध्ये लक्षणे गंभीर नसावीत. म्हणूनच ज्यांनी अजूनही लस घेतलेली नाही किंवा पहिला डोस घेऊन दुसरा डोस घेण्यास विलंब लावत आहेत त्यांनी लस घ्यावी असं आवाहन केलं जात आहे.

काळजी घेणं महत्त्वाचं
ओमायक्रॉन रुग्णांमध्ये सौम्य लक्षण दिसत असली तरी रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहाता काळज घेणं महत्त्वाचं आहे. देशातील लोकसंख्येचा आकडा पाहता एक टक्का लोकांनाही रुग्णालयात दाखल करावं लागलं तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. यासाठी कोविड नियमांचं पालन करणं आवश्यक आहे.