मुंबई : अडचणीत असलेल्या दोन जणांचा एका वाढदिवसाच्या केकने जीव वाचवला आहे. हे वाचून कदाचित तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. मात्र ही गोष्ट खरी असून मध्य प्रदेशातील घडली आहे.
मध्य प्रदेशातील बुरहानपूर या ठिकाणी फिरोज नावाच्या एका व्यक्तीच्या मुलाच्या वाढदिवसाची पार्टी आयोजित करण्यात आली होती. दरम्यान फिरोजच्या मुलाची पार्टी सुरु असताना त्या ठिकाणी अचानक उसाच्या शेतातून बिबट्या समोर आला. यावेळी फिरोज आणि त्याच्या भावाची घाबरगुंडी उडाली.
फिरोज आणि त्याचा भाऊ साबिर बाईकवरून केक आणत होते. दरम्यान त्याचवेळी हा बिबट्या शेतातून आला आणि या दोन भावांच्या पाठलाग करू लागला. त्यावेळी दोन्ही भावांना जीव वाचवण्यासाठी काही सुचलं नाही. अशावेळी त्यांनी हातात असलेला वाढदिवसाचा केक पाठलाग करणाऱ्या बिबट्यावर फेकून मारला.
केक बिबट्यावर फेकताच तो त्याच्या संपूर्ण शरीरावर पसरला. यामुळे तो बिबट्या घाबरला आणि पुन्हा शेताच्या वाटेने धावत गेला. या घटनेसंबंधी सांगताना साबिर म्हणाले, तो बिबट्या 500 मीटरपर्यंत आमचा पाठलाग करत होता. केवळ त्या केकमुळे आम्ही थोडक्यासाठी वाचलो.
दरम्यान या घटनेची माहिती वन अधिकाऱ्यांना देण्यात आली. वन अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, जेव्हा कधी आपल्याला धोक्याची जाणीव होते त्यावेळी आपण काहीही करू शकतो ही आपली प्रवृत्ती असते. या दोन भावडांनीही तेच केलं. त्यावेळी त्यांच्याकडे केक होता जो त्यांनी बिबट्यावर फेकून मारला. यामुळे तो घाबरला आणि दोन भावडांचा जीव वाचला.
भारतात बिबट्यांची संख्या 2014 आणि 2018च्या दरम्यान 60 टक्क्यांनी वाढल्याचं समोर आलं होतं. ही संख्या जवळपास 13000 पोहोचली आहे. सरकारच्या माहितीनुसार, मध्य प्रदेशात सर्वाधिक बिबट्यांची संख्या आहे