Lalu Yadav to Rahul Gandhi on Marriage: बिहारची राजधानी पाटणात विरोधी पक्षांची बैठक (Opposition Meeting) पार पडली. यात देशभरातील 15 पक्षातील 27 प्रमुख नेते सहभागी झाले होते. भाजपाला (BJP) सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. आता पुढची बैठक 12 जुलैला शिमला इथं होणार आहे. या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगितलं जातं. या बैठकीत देशभरातील प्रमुख विरोधी पक्ष नेत सहभागी झाले असले तरी लक्ष वेधून घेतलं ते राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी. दिर्घ काळानंतर आजारपणातून बरे झालेले लालू यादव यांनी आपल्या खास शैलीत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना एक सल्ला दिला आणि पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला.
लालू प्रसाद यादव यांनी राहुल गांधींना लग्नावरुन मिश्किल सल्ला दिला. यावर राहुल गांधी यांनी हसत उत्तर दिलं. तुम्ही सांगितलंय आता लग्न होईल असं राहुल गांधी म्हणाले. त्याचबरोबर लालू यादव यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचं कौतुक केलं. अदानी प्रकरणावर आवाज उठवल्याचा हवाला देत लोकसभेत चांगलं काम केल्याची शाबासकीही लालू यादव यांनी राहुल गांधी यांना दिली.
'नुसती दाढी वाढवू नका'
मिश्किल स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या लालू यादव यांनी आपल्या भाषणात राहुल गांधी यांना दाढीवरुन सल्ला दिला. दाढी आणखी वाढवू नका. 'तुम्ही माझा सल्ला ऐकला नाही, अजून लग्न केलं नाही. पण अजूनही वेळ गेलेला नाही लग्न उरकून टाका. वराती म्हणून आम्ही येऊ' असं लालू यादव म्हणाले आणि एकच हशा पिकला. सोनिया गांधी यांनी एकदा सांगितलं होतं की राहुल लग्नासाठी ऐकत नाही, तुम्हीच त्याच्या लग्नाचं पाहा. त्यामुळे आता लग्न करा असा सल्ला लालू यादव यांनी दिला.
किमान समान कार्यक्रमावर चर्चा
मोदी सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी अशा पद्धतीनं पहिल्यांदाच विरोधक एकवटले आहेत. मोदी-शाहांना रोखण्याची रणनीती, किमान समान कार्यक्रमावर या बैठकीत चर्चा झाली. विरोधकांच्या 3 समित्या बनवण्याची रणनीती, राष्ट्रीय पातळीवर प्रत्येक पक्षातील प्रमुख नेत्याचा सहभाग असणारी उच्चस्तरीय समिती, रणनीतीची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यकारी समितीची स्थापना, राज्यनिहाय भाजपला रोखण्यासाठी विरोधकांची प्रादेशिक कार्यकारिणी, विरोधी एकजूटीसाठी संयोजकांची नियुक्ती, लोकसभेतील जागांच्या दृष्टीनं देशातील नंबर दोनचं राज्य असणा-या महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत किमान समान कार्यक्रमाची आखणी, केसी राव यांची बीआरएस, प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी, औवैसींची एमआयएम, मायावतींच्या बसपामुळे विरोधी एकजूटीला नुकसान होऊ शकतं, याबाबत निश्चित रणनीती आखणं अशी रणनिती आखण्यात आली.