Padma Awards 2023: 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यावेळेस एकूण 26 लोकांना या पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. दिलीप महालनोबिस (Dilip Mahalanabis) यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म विभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार आहे. कृषी, आरोग्य, संस्कृती, शिक्षण यासारख्या वेगवगेळ्या क्षेत्रांमध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या मान्यवरांचा यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे.
पश्चिम बंगालचे रहिवाशी असलेल्या डॉक्टर दिलीप महालनोबिस यांना पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन म्हणजेच ओआरएस तंत्रज्ञानासाठी ओळखल्या जाणाऱ्या 87 वर्षीय दिलीप महालनोबिस यांना पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. ओआरएसच्या माध्यमातून जगभरामध्ये पाच कोटी लोकांचे प्राण वाचवण्यात यश मिळालं आहे. दिलीप महालनोबिस यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये दिलीप महालनोबिस यांचं निधन झालं.
रतन चंद्र कार यांना आंदमान आणि निकोबारमध्ये वैदकीय सेवेसाठी पद्म श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. रतन चंद्र कार यांनी जरवा जमातीच्या लोकांसाठी विशेष काम केलं आहे. 1999 साली आलेली साथ असेल किंवा या जमातीमधील संस्कृती जतन करण्यासाठी रतन यांनी मोलाचं योगदान दिलं आहे. गुजरातमधील हिराबाई लोबी यांना समाजसेवेसाठी पद्म श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 62 वर्षीय हिराबाई या येथील आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी, महिलांसाठी काम करतात.
#PadmaAwards2023 | ORS pioneer Dilip Mahalanabis to receive Padma Vibhushan (posthumous) in the field of Medicine (Pediatrics).
25 other personalities across various walks of life to receive Padma Shri. pic.twitter.com/nIFthqsogE
— ANI (@ANI) January 25, 2023
मध्य प्रदेशमध्ये मागील 50 वर्षांपासून गरिबांना मोफत सेवा देणाऱ्या मुन्शीवर चंद्र दावर यांना पद्म श्री पुरस्कार जाहीर झाला आहे. केवळ 20 रुपयांच्या माफक दरात दावर गरिबांवर उपचार करतात. आसाममधील रामकुवांम्बे न्यूमी यांना यांना पद्म श्रीने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच समाजसेवक व्ही. पी. अप्पुकुट्टन पौडवाल, स्वस्त आरोग्य सेवा पुरवणाऱ्या साखुरथारी चंद्र शेखर, प्राण्यांसाठी काम करणारे वाडिवल गोपाल आणि मासी सादानिया या जोडीलाही पद्म श्री पुरस्कारने सन्मानित करण्यात येणार आहे.
धनीराम टोटो यांना टोटो भाषेसाठी केलेल्या कामाबद्दल पद्म श्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच बी रामकृष्ण रेड्डी यांना भाषेसंदर्भातील कामासाठी पद्म श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अजय कुमार मांडवी यांना लाकडी शिल्पांच्या क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानासाठी पद्म श्री पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. राणी मच्चीहा यांना पारंपारिक नृत्य प्रकारामध्ये कामगिरीसाठी पद्म श्री पुरस्कार जाहीर झाला आहे. के. सी. रनरीमासंगी यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी पद्म श्री पुरस्कस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. रिसिंगबोर कुर्कालंग यांना पारंपरिक संगीत क्षेत्रातील योगदानासाठी पद्म श्री पुरस्कार दिला जाणार आहे. या क्षेत्रातील कामगिरीसाठी मोआ सुनबाँग, मुनिवेंक्कटप्पा, मंगल कांती रॉय यांचाही सन्मान केला जाणार आहे. नृत्य क्षेत्रातील योगदानासाठी दोमार सिंह कुनावर यांना तर नाट्य क्षेत्रातील योगदानासाठी परशुराम कोमाजी कुणके यांना पद्म श्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कुणके हे महाराष्ट्रातील गडचिरोलीमधील झाडीपत्ती रणभूमीवरील कलाकार आहेत.
तसेच, तुला राम उपरेती यांना कृषी क्षेत्रातील कामासाठी, निकाराम शर्मा यांनाही कृषी क्षेत्रातील योगदानासाठी पद्म श्री पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. तर आदिवासी हो भाषेसाठी काम करणाऱ्या जानूम सिंह सोय यांनाही पद्म श्री पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. गुलाम मोहम्मद झाज यांना क्राफ्ट, भानूभाई चित्रा तसेच परेश रथावा यांना चित्रकलेसाठी पद्म श्री पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. वस्त्र उद्योगातील योगदानासाठी कपील देव प्रसाद यांना पद्म श्री पुरस्कार दिला जाणार आहे.