इस्लामाबाद : पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाईट हॅक झाल्याची माहिती शनिवारी समोर आली. अधिकृत वेबसाईट हॅक झाल्याच्या काही तक्रारी येऊ लागल्यानंतर ही बाब निदर्शनास आल्याची माहिती पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी मोहम्मद फैजल यांनी दिली. सूत्रांचा हवाला देत 'डॉन'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार हा सायबर हल्ला भारताकडून घडवून आणल्याचा आरोप पाकिस्तानकडून करण्यात येत आहे.
सध्या आयटी तज्ज्ञ वेबसाईट हॅक करणाऱ्यांवर कारवाई करत परिस्थितीवर लक्ष केंद्रीत करत असल्याची माहिती समोर येत आहे. फैजल यांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानमध्ये ही वेबसाईट कोणत्याही अडचणीशिवाय सुरू आहे. पण, ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया, युनायटेड किंग्डम आणि नेदरलँड्स येथून ही वेबसाईट सुरू होण्यात काही अडचणी येत असल्याचे पाहायला मिळाले.
जम्मू- काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतरच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाईट हॅक झाल्यामुळे या प्रकरणाला एक नवे वळण मिळाले आहे. पाकिस्तानकडून दहशतवादी संघटनांना मिलणाऱ्या समर्थनाचा मुद्दा उचलून धरत बऱ्याच देशांनी त्यांच्या या भूमिकेचा निषेध केला. इतकेच नव्हे तर, पाकिस्तानने तातडीने दहशतवादी संघटनानांना आसरा देणे आणि आर्थिक सहाय्य पुरवणे बंद करावे अशी मागणीही अमेरिकेकडून करण्यात आली. जवळपास पन्नासहून अधिक देशांनी भारतात झालेल्या या हल्ल्याचा निषेध करत दहशतवादाशी लढा देण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाची पावले उचलली आहेत. इतकेच नव्हे तर भारताकडून पाकिस्तानचा विशेष राष्ट्राचा दर्जाही काढून घेण्यात आला आहे.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये असणारे संबंध आणि त्यात पुलवामान हल्ल्यासारख्या घडणाऱ्या घटना पाहता परिस्थितीती आणखी गंभीर झाली आहे. मुख्य म्हणजे जैश-ए-मोहम्मदकडून घडवण्यात आलेल्या या हल्ल्याचं उच्चर त्यात पद्धतीत देण्याच यावं अशी मागणी शहीदांच्या कुटुंबीयांकडून आणि देशातील जनतेकडून करण्यात येत आहे. इतकेच नव्हे, तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पाकिस्तानच्या या कृत्याचं सडोतोड उत्तर देणार असल्याचा इशारा दिला होता. त्यामुले पुढे या प्रकरणात कोणत्या घडामोडी घडणार याकडेच साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे.