नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकवेळा परदेश दौऱ्यावर जातात. परदेश दौऱ्यांवर जाताना मोदींचं विमान अनेकवेळा पाकिस्तानवरून जातं. पाकिस्तान सरकारनं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विमान लाहोरवरून जात असल्यामुळे भारताला २.८६ लाख रुपयांचं बिल पाठवलं आहे. भारतीय वायुसेनेच्या विमानाच्या रुट नॅविगेशन शुल्काच्या रुपात पाकिस्ताननं हे बिल दिलं आहे.
पाकिस्ताननं अशाप्रकारे बिल पाठवल्याची माहिती आरटीआय अंतर्गत मिळाली आहे. हे शुल्क पंतप्रधानांचं विमान लाहोरला थांबल्यामुळे तसंच रशिया, अफगाणिस्तान, इराण आणि अन्य दौऱ्यांसाठी पाठवण्यात आलं आहे. २०१६ मध्ये मोदींनी भारतीय वायुसेनेचं विमान ११ देशांच्या यात्रांसाठी वापरलं होतं. यामध्ये नेपाळ, भूटान, बांग्लादेश, अफगाणिस्तान, कतार, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, रशिया, इराण, फिजी आणि सिंगापूर हे ते देश आहेत.
२५ डिसेंबर २०१५ साली मोदींनी पाकिस्तानचे तेव्हाचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची लाहोरमध्ये जाऊन भेट घेतली होती. मोदी रशिया आणि अफगाणिस्तानच्या दौऱ्यावरून परत येत असताना ही भेट झाली. यासाठी रुट नेविगेशन शुल्क म्हणून पाकिस्ताननं १.४९ लाख रुपयांचं बिल पाठवलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २२-२३ मे २०१६ साली इराण दौरा केला होता. या दौऱ्याचं ७७,२१५ रुपये बिल तर ४-६ जून २०१६ साली मोदी कतारला गेले होते. तेव्हाचं ५९,२१५ रुपयांचं शुल्क पाकिस्ताननं लावलं आहे. या दोन्ही दौऱ्यांवेळी मोदींचं विमान पाकिस्तानवरून गेलं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार २०१४ ते २०१६ दरम्यान मोदींनी दौऱ्यांसाठी वापरलेल्या वायुसेनेच्या विमानांवर जवळपास २ कोटी रुपये खर्च करण्यात आला.